असा उलगडला 'व्हीपीएस' सर्व्हरचा बनाव! सायबर भामट्यांचा तांत्रिक पाठीराखा अखेर जेरबंद 
Arth Warta

सायबर गुन्हेगारांचा 'सर्व्हर गुरु' मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!

व्हर्चुअल प्रायव्हेट सर्व्हरच्या (VPS) माध्यमातून तयार करत होता फसव्या वेबसाईट; मुंबई सायबर पोलिसांकडून नेटवर्कचा पर्दाफाश.

Prachi Tadakhe

मुंबई: ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांविरुद्ध मुंबई सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत सायबर गुन्हेगारांना तांत्रिक रसद पुरवणाऱ्या एका अट्टल वेब डेव्हलपरच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रविण हुकुमचंद (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला हरियाणातून ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर भामट्यांना ‘व्हर्चुअल प्रायव्हेट सर्व्हर’ (VPS) उपलब्ध करून देऊन फसवणुकीची संकेतस्थळे चालवण्यास मदत केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रविण हुकुमचंद हा पेशाने वेब डेव्हलपर आहे. संकेतस्थळे (Websites) बनवणे आणि सर्व्हर व्यवस्थापनाचे सखोल तांत्रिक ज्ञान त्याला होते. याच ज्ञानाचा गैरवापर करत तो गेल्या काही काळापासून सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आला होता. गुन्हेगारांना ओळख लपवून डिजिटल फसवणूक करता यावी, यासाठी तो त्यांना ‘व्हीपीएस’ (VPS) सर्व्हरची सुविधा पुरवत होता.

सायबर भामटे या व्हीपीएस सर्व्हरचा वापर करून बनावट व फसव्या बँकिंग किंवा शॉपिंग वेबसाईट तयार करत असत. या संकेतस्थळांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट केली जात होती. मुख्य म्हणजे, या तांत्रिक पायाभूत सुविधा पुरवण्याच्या मोबदल्यात आरोपी प्रविण हा सायबर गुन्हेगारांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आरोपीने आतापर्यंत किती सायबर गुन्हेगारांना अशा प्रकारची तांत्रिक मदत पुरवली आहे आणि या नेटवर्कच्या माध्यमातून किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास मुंबई सायबर पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT