BIG ALERT: रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढीचे संकेत 
Arth Warta

RBI Repo Rate: EMI वाढणार की FD चे व्याज?

अमेरिकेत व्याजदर वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर सावट; ऑक्टोबरमध्ये रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ५.७५% होण्याचा अंदाज

Prachi Tadakhe

मुंबई: जागतिक अर्थकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल रिझर्व्ह) महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या बेंचमार्क व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. या वाढीनंतर अमेरिकेतील व्याजदर ३.७५% ते ४.००% च्या श्रेणीत पोहोचले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता संपूर्ण अर्थजगताचे लक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आगामी मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) बैठकीकडे लागले आहे.

देशांतर्गत बाजारात महागाईचा दबाव असाच वाढत राहिल्यास, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील येत्या काळात रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते, असा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

भारतात किरकोळ महागाईचा आलेख उंचावत चालला आहे. जुलै महिन्यात महागाईचा दर ४.४५% होता, जो ऑगस्टमध्ये वाढून ४.८२% वर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अन्नधान्य महागाईमुळे येत्या काळात हा दर ६ टक्क्यांच्या सर्वोच्च मर्यादेजवळ पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमजोर झाल्याने आयातीचा खर्च वाढला आहे. भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल परदेशातून आयात करतो. तेलाचे दर वाढल्याने देशाच्या आयात बिलावर ताण पडत असून चलनाचे मूल्य घसरत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या बैठकीत प्रत्येकी २५-२५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून रेपो दर ५.७५% पर्यंत नेऊ शकते, असा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर जागतिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास त्याचा थेट आणि त्वरित परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर, विशेषतः गृहकर्ज आणि मुदत ठेवींवर दिसेल:

१. गृहकर्जदारांवरील परिणाम (Home Loan EMI):

ज्या ग्राहकांचे गृहकर्ज फ्लॉटिंग-रेट किंवा बाह्य बेंचमार्कशी (EBLR) जोडलेले आहे, त्यांच्या कर्जाचे व्याजदर थेट वाढतील. यामुळे ग्राहकांचा मासिक हप्ता (EMI) महागू शकतो किंवा EMI तोच राहिल्यास कर्जाचा पुनर्भुकतान कालावधी (Tenure) लांबू शकतो.

२. मुदत ठेवीदारांना दिलासा (Fixed Deposits):

रेपो दरात वाढ झाल्यास बँका त्यांच्या गरजेनुसार आणि धोरणानुसार मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरातही वाढ करू शकतात. मात्र, ही वाढ सर्वच कालावधीच्या एफडीवर एकाच वेळी न होता, बँकांच्या रोख रकमेच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने लागू होईल.

काय काळजी घ्यावी?

गृहकर्जदारांनी वाढत्या व्याजदरांचा सामना करण्यासाठी आपल्या मासिक बजेटमध्ये आवश्यक ते बदल करून ठेवावेत, तर नवीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ठेवीदारांसाठी येणारा काळ एफडीवर अधिक चांगला परतावा मिळवून देणारा ठरू शकतो.

SCROLL FOR NEXT