सावध राहा! उंब्रजमध्ये सायबर क्राईमचे आंतरराज्यीय कनेक्शन; ८.३० लाखांची फसवणूक उघड 
Arth Warta

कमिशनचे आमिष अन् बँक खाते भाड्याने! एका चेकने उघड केले सायबर रॅकेट

खातं कुणाचे , पैसे कुणाचे अन् कॅश उंब्रजमध्ये! पाहा कसा रचला गेला बँक फसवणुकीचा कट.

Prachi Tadakhe

उंब्रज : देशभरात सायबर फसवणुकीचे जाळे पसरवणाऱ्या गुन्हेगारांनी आता ग्रामीण भागातील बँक खात्यांचा वापर करण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका खात्यातून सायबर फसवणुकीतील सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांची रक्कम चेकद्वारे रोखीने काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सातारा सायबर पोलीस ठाण्यात संबंधित बँक खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’ (NCRP) आणि ‘महाराष्ट्र सायबर, मुंबई’ यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक डेटाच्या विश्लेषणातून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप जगन्नाथ पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाकडून नाशिक ग्रामीण आणि सातारा सायबर पोलिसांना मिळालेल्या माहितीची तपासणी करताना उंब्रज शाखेतील खात्याचा गैरवापर झाल्याचे समोर आले. या बँक खात्याची अधिक माहिती घेतली असता, या खात्याविरोधात उत्तर प्रदेशातील 'पंतनगर/पीलीभीत' आणि 'तेलंगणा' राज्यात सायबर फसवणुकीच्या गंभीर तक्रारी नोंद असल्याचे आढळले.

संबंधित खात्यातून अनुक्रमे ३ लाख ३० हजार रुपये आणि ५ लाख रुपये असे एकूण ८ लाख ३० हजार रुपये चेकद्वारे रोख स्वरूपात काढले गेले आहेत.

सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यावर न मागवता देशभरातील इतर नागरिकांच्या ('म्युले अकाऊंट्स') खात्यांचा वापर करतात. सर्वसामान्यांना ठराविक कमिशनचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या नावे बँक खाती उघडली जातात. त्यानंतर या खात्यांवर फसवणुकीचे पैसे मागवून ते एटीएम किंवा चेकद्वारे रोखीने काढले जातात आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचवले जातात, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

उंब्रज येथील स्टेट बँकेचे संबंधित खाते नेमके कोणाच्या नावावर आहे, हे खातेदार स्वतः या गुन्ह्यात सामील आहे की त्याचा केवळ वापर केला गेला आहे, तसेच या खात्यावरून आतापर्यंत झालेले सर्व संशयास्पद व्यवहार तपासण्याचे काम पोलिसांनी वेगाने सुरू केले आहे.

या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.

पोलीस आवाहन:

नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते, चेकबुक, एटीएम कार्ड किंवा ओटीपी (OTP) अनोळखी व्यक्तींच्या हवाली करू नये. स्वतःचे बँक खाते भाड्याने देणे किंवा दुसऱ्याच्या पैशांचे व्यवहार स्वतःच्या खात्यावरून करणे हा कायदेशीर गुन्हा असून यामध्ये कठोर कारवाई होऊ शकते.

SCROLL FOR NEXT