मुंबई: आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरीस येत असून ३१ मार्च २०२६ ही तारीख करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही कामे प्रलंबित ठेवल्यास दंड, व्याज आणि चौकशीचा सामना करावा लागू शकतो.
मार्च महिना हा कर नियोजनाचा शेवटचा टप्पा मानला जातो. विशेषतः व्यापारी, फ्रीलान्सर, गुंतवणूकदार आणि एनआरआय यांनी या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
ज्या करदात्यांचे उत्पन्न परदेशातून येते किंवा जे परदेशात काम करतात, त्यांनी तिथे भरलेल्या कराचा लाभ भारतात मिळवण्यासाठी फॉर्म ६७ सादर करणे गरजेचे आहे. हे न केल्यास त्याच उत्पन्नावर पुन्हा कर भरावा लागू शकतो. त्यामुळे दुहेरी कर टाळण्यासाठी ३१ मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
पूर्वी भरलेल्या आयटीआरमध्ये काही चूक झाली असेल किंवा एखादे उत्पन्न दाखवायचे राहिले असेल, तर आयकर कायद्याच्या कलम १३९(८ए) अंतर्गत अपडेटेड रिटर्न भरता येतो.
मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे.
यानंतर ही संधी मिळणार नाही. त्यामुळे चुका दुरुस्त न केल्यास मोठा दंड लागू शकतो.
पगाराव्यतिरिक्त उत्पन्न (उदा. शेअर बाजार, भाडे, फ्रीलान्सिंग, कॅपिटल गेन्स) असणाऱ्या करदात्यांसाठी ॲडव्हान्स टॅक्स भरणे बंधनकारक आहे.
३१ मार्चपर्यंत संपूर्ण कर दायित्व भरले नाही, तर दरमहा १% व्याज लागू होते (कलम २३४बी आणि २३४सी).
दंड आणि अतिरिक्त व्याज
प्राप्तिकर विभागाकडून नोटीस
चौकशी व कायदेशीर गुंतागुंत
३१ मार्चनंतर अनेक सुधारणा करण्याची संधी संपते. त्यामुळे करदात्यांनी आजच आपली कागदपत्रे तपासून आवश्यक ती कामे पूर्ण करणे हिताचे ठरेल.