मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) केंद्रीय भरती व पदोन्नती विभागामार्फत (कॉर्पोरेट सेंटर, मुंबई) नियमित तत्त्वावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (Specialist Cadre Officers) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 'डेटा सायंटिस्ट' संवर्गातील एकूण २० रिक्त जागा भरल्या जाणार असून, पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक CRPD/SCO/२०२६-२७/३१ नुसार ही भरती नियमित पदांसाठी असणार आहे. यामध्ये
मुख्य व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): या एसएमजीएस-IV श्रेणीतील पदासाठी २ जागा उपलब्ध असून, त्यासाठी उमेदवाराचे वय किमान २७ ते कमाल ३७ वर्षे असावे.
व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): या एमएमजीएस-III श्रेणीतील पदासाठी सर्वाधिक १४ जागा असून, यासाठी किमान वयोमर्यादा २६ वर्षे आणि कमाल ३६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
उप-व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): या एमएमजीएस-II श्रेणीतील पदासाठी ४ जागा रिक्त असून, त्यासाठी उमेदवाराचे वय किमान २४ ते कमाल ३२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
सर्व पदांसाठी वयोमर्यादेची गणना ३१ ऑक्टोबर २०२६ या तारखेनुसार केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना १० डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येतील. पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता, अनुभव, नोकरीचे तपशील आणि आवश्यक शुल्काची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर https://sbi.bank.in/web/careers/current-openings येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आणि शुल्क जमा करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासून घ्यावी, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवारांना काही शंका असल्यास ते बँकेच्या वेबसाईटवरील https://sbi.bank.in/web/careers/post-your-query या लिंकवर जाऊन “CONTACT US” मधील “Post Your Query” पर्यायाद्वारे आपली विचारणा नोंदवू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी ०२२-२२८२०४२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.