नाव, मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी निगडित माहिती तडजोड झाल्याची शंका; ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन. 
Arth Warta

डार्क वेबवर डेटा उघड झाल्याचा संशय; SBI ने सक्रिय केले तातडीचे प्रोटोकॉल

३,८९७ ग्राहकांचे संवेदनशील रेकॉर्ड्स लीक झाल्याचा संशय; CERT-In आणि सायबर एजन्सीकडून सखोल चौकशी सुरू.

Prachi Tadakhe

मुंबई: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या लाखो ग्राहकांच्या चिंतेत भर पाडणारी माहिती समोर आणली आहे. ग्राहकांचा अत्यंत संवेदनशील डेटा डार्क वेबवर (Dark Web) लीक झाल्याचा संशय एसबीआयने व्यक्त केला आहे. याप्रकरणी बँकेने बुधवारी शेअर बाजाराला (Exchange Filing) अधिकृत माहिती दिली.

डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या सुमारे ३,७५,००० रेकॉर्ड्सच्या प्राथमिक विश्लेषणादरम्यान, वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती (PII) असलेले ३,८९७ ग्राहकांचे रेकॉर्ड्स लीक झालेले आढळून आले आहेत.

कोणती माहिती लीक झाल्याचा संशय?

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डार्क वेबवर उघड झालेल्या डेटामध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक आणि बँकिंग व्यवहारांशी संबंधित संवेदनशील गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने:

  • ग्राहकांचे नाव, जन्मतारीख आणि लिंग

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी

  • रहिवासी पत्ता व संबंधित बँकेची शाखा

  • CIF (Customer Information File) ओळखपत्रे आणि लीड आयडी (Lead IDs)

  • कर्जाच्या नोंदी व इतर संबंधित फाइल्सचा मेटाडेटा (Metadata)

१६ ऑक्टोबरला मिळाली पहिली सूचना

बँकेला १६ ऑक्टोबर २०२६ रोजी तिच्या थ्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, डिफेन्स सायबर एजन्सी (DCA) आणि CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) यांच्याकडून या सायबर सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत (Data Breach) पत्रे आणि सूचना मिळाल्या. या सूचना मिळताच बँकेच्या यंत्रणा सतर्क झाल्या.

बँकेने उचललेली तातडीची पावले

माहिती मिळताच एसबीआयने आपले ‘सायबर घटना प्रतिसाद आणि नियंत्रण प्रोटोकॉल’ (Cyber Incident Response Protocol) तत्काळ सक्रिय केले आहेत.

  • स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती: या कथित डेटा लीकचे नेमके स्वरूप, व्याप्ती आणि डेटा उघड होण्याचा मूळ स्रोत शोधण्यासाठी CERT-In सूचीबद्ध स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सखोल चौकशी सुरू: उघड झालेल्या माहितीची सत्यता आणि पूर्णता पडताळण्यासाठी तसेच यामुळे ग्राहक आणि बँकेला संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सविस्तर तपास केला जात आहे.

ग्राहकांनो घाबरू नका! मुख्य बँकिंग सेवेवर कोणताही परिणाम नाही

या घडामोडीमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी एसबीआयने स्पष्ट केले आहे की, या घटनेचा बँकेच्या मुख्य व्यवसाय कार्यांवर, आर्थिक कामगिरीवर किंवा व्यवसायाच्या सातत्यावर (Business Continuity) कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.

"बँकेची मुख्य व्यवसाय कार्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय नेहमीप्रमाणे सामान्यपणे सुरू आहेत. बँक संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नियमांनुसार सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे." - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

डेटा लीकच्या घटनांमुळे डिजिटल बँकिंग क्षेत्रातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एसबीआयच्या मुख्य सिस्टीम सुरक्षित असल्या तरी, डेटा उघड झाल्यामुळे ग्राहकांना फिशिंग (Phishing) कॉल्स, बनावट मेसेज किंवा सायबर फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो.

ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना:

  1. बँक अधिकारी बनून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद फोन किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका.

  2. आपला OTP, पासवर्ड किंवा नेट बँकिंग पिन कोणासोबतही शेअर करू नका.

  3. बँकेच्या अधिकृत ॲप्स आणि वेबसाइटचाच वापरासाठी उपयोग करा.

SCROLL FOR NEXT