सभापती प्रणवजी पोळकर यांच्याहस्ते शिबिराचा शुभारंभ; प्रत्येक तालुक्यात शिबिरे राबवण्याचा संकल्प. 
Arth Warta

समर्थ भंडारी पतसंस्थेचे दुसरे रक्तदान शिबीर संपन्न; सामाजिक कार्याचा आदर्श

चिखली येथे पार पडलेल्या शिबिराला रक्तदात्यांचा मोठा पाठिंबा; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव.

Prachi Tadakhe

चिपळूण: श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूणच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नुकतेच गुहागर तालुक्यातील चिखली येथील आयुष्मान आरोग्य केंद्रात दुसऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागपूर आणि सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबिराचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष मा. प्रभाकरजी आरेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आला. तर गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणवजी पोळकर, आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीच्या डॉ. स्नेहल धुमाळ, अधिपरीचारिका जयश्री कुंडलकर तसेच संचालक स्मिता आरेकर आणि पराग आरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. या पवित्र कार्यात संस्थेचे ५२ सभासद, कर्मचारी व सेवाभावी नागरिकांनी प्रत्यक्ष रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक

यावेळी बोलताना सभापती प्रणवजी पोळकर यांनी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेत रक्तदानासारख्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे विशेष कौतुक केले. तसेच भविष्यात जलसंवर्धनासारख्या उपक्रमांसाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मनोरंजनाच्या कार्यक्रमांना फाटा देऊन रक्तदानासारखा आरोग्यदायी उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्या अधिपरीचारिका जयश्री कुंडलकर यांनी संस्थेच्या या भूमिकेचे खाजगीत व जाहीरपणे स्वागत केले.

प्रत्येक तालुक्यात शाखांच्या माध्यमातून शिबिरांचे नियोजन

संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष हे समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या दुसऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन चिपळूण येथे करण्यात आल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. येत्या काळात प्रत्येक तालुक्यात त्या-त्या ठिकाणच्या शाखांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे मा. प्रभाकरजी आरेकर यांनी स्पष्ट केले.

या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि आयुष्मान आरोग्य केंद्र, चिखलीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शिबिरासाठी सर्व सोयीसुविधांसह सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. जांगीड व डॉ. इंगळे यांचे विशेष आभार मानण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरण

शिबिराच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती सदस्या उर्वी खैर, चिखली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. दळवी, चिखली विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी आरेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश शिर्के, भगवानशेठ कदम, दत्ताराम कानसे, चंद्रकांत चांमतौर, अशोक साळवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

रक्तदात्यांसह संस्थेचे अनेक सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेचे व्यवस्थापक संदीप रहाटे यांनी मानले.

SCROLL FOR NEXT