मुंबई: आधुनिक बँकिंग व्यवस्थेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणे काळाची गरज आहे. मात्र, तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता अंतिम निर्णयासाठी आणि सिस्टीममधील त्रुटी ओळखण्यासाठी 'मानवी हस्तक्षेप' आणि 'मानवी निर्णयक्षमता' (Human Judgment) अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर शिरीष चंद्र मुर्मू यांनी केले.
मुंबईत आयोजित 'बँकिंग ट्रान्सफॉर्मेशन समिट'मध्ये बोलताना मुर्मू यांनी बँकिंग क्षेत्रातील एआयचा वापर, त्याचे धोके आणि रिझर्व्ह बँकेची धोरणात्मक भूमिका यावर सविस्तर भाष्य केले.
बुद्धिमत्ता केवळ एआयपुरती मर्यादित नको
मुर्मू यांनी स्पष्ट केले की, बँकिंग क्षेत्रातील बुद्धिमत्ता ही केवळ एआयपुरती मर्यादित असू नये. "एआयसोबतच विश्लेषणात्मक, मानवी, प्रशासकीय आणि सामूहिक बुद्धिमत्तेचा एकत्र विचार होणे गरजेचे आहे. एखादे एआय मॉडेल एकंदरीत चांगले काम करत असले, तरी ते एखाद्या विशिष्ट आणि असुरक्षित घटकासाठी अपयशी ठरू शकते. म्हणूनच, तंत्रज्ञानाने दिलेला आउटपुट प्रत्यक्षात योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी मानवी निर्णयक्षमता अपरिहार्य आहे."
नवीन आणि पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी एआयचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. अनेकदा बँकांकडे नवीन कर्जदारांबद्दल पुरेशी माहिती नसते. "माहितीचा अभाव असणे म्हणजे ती व्यक्ती किंवा कर्ज प्रस्ताव वाईट आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. 'आम्हाला माहित नाही' याचा अर्थ 'ते वाईट आहे' असा लावल्याने योग्य ग्राहकांचे कर्ज नाकारले जाते. नेमक्या याच ठिकाणी बँकांनी तांत्रिक क्षमतेचा वापर करून योग्य विश्लेषण केले पाहिजे," असे मुर्मू म्हणाले.
'डिजिटल फसवणुकी'विरुद्ध सामूहिक गुप्त माहितीचा वापर
सगळ्याच बँकांनी एकाच पद्धतीचे तंत्रज्ञान वापरल्यास प्रणालीची कार्यक्षमता वाढते, पण यामुळे 'केंद्रीकरणाचा धोका' निर्माण होऊन एकाच वेळी अनेक खात्यांवर डिजिटल फसवणुकीचा हल्ला होऊ शकतो.
रिझर्व्ह बँकेचे उत्तर: अशा सामूहिक धोक्यांचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने MuleHunter.ai आणि डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत.
फायदा: एआयच्या मदतीने विखुरलेले संशयास्पद संकेत एकत्र आणून संभाव्य सायबर धोके आणि फसवणूक वेळेत ओळखणे शक्य होते.
बँकिंगमधील उत्पादकता म्हणजे केवळ प्रति कर्मचारी उत्पादन किंवा खर्च कपात करणे नव्हे, असा टोला त्यांनी लगावला. "जर एआयच्या वापरामुळे नवीन कर्जदारांपर्यंत पोहोचता आले नाही, ग्राहकांचा अनुभव सुधारला नाही आणि केवळ खर्च कमी झाला, तर आपण प्रणाली सुधारण्याऐवजी फक्त जुन्या त्रुटींना स्वयंचलित (Automate) केले असा त्याचा अर्थ होईल," असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.