नवीन नियमांनुसार, जर बँक खात्यात आधीच 'नॉमिनी'चे (नामनिर्देशित व्यक्ती) नाव नोंदवलेले असेल किंवा खाते 'आयदर ऑर सर्व्हायव्हर' (Either or Survivor) या तत्त्वावर सुरू असेल, तर बँका खालील कागदपत्रांची सक्ती करू शकत नाहीत:
सक्सेशन सर्टिफिकेट/प्रोबेट: न्यायालयाकडून मिळणारे वारसाहक्क प्रमाणपत्र किंवा प्रोबेट सादर करण्याचा आग्रह बँकांना धरता येणार नाही.
इंडॅम्निटी बाँड (भरपाई हमीपत्र): खात्यात कितीही मोठी रक्कम जमा असली, तरीही वारसदाराकडून भरपाई हमीपत्र किंवा जामीनदाराची (Guarantor) सक्ती केली जाणार नाही.
ज्या खात्यांमध्ये नॉमिनीचे नाव नोंदवलेले नाही, अशा खात्यांसाठीही बँकांना एक ठरावीक मर्यादा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मर्यादेपर्यंतची रक्कम एका साध्या अर्जाद्वारे आणि आवश्यक पडताळणीनंतर कुटुंबाला त्वरित मिळू शकेल.
मृत खातेदाराच्या अवलंबितांना कोणताही अतिरिक्त त्रास न होता पैसे मिळवण्यासाठी वारसदार पुढील ३ टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात:
बँकेशी संपर्क साधणे: सर्वप्रथम दावा करणाऱ्या व्यक्तीने मृत खातेदाराच्या बँक शाखेला प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा बँकेच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलचा वापर करावा.
दावा अर्ज (Claim Form) भरणे: बँकेकडून मिळणारा क्लेम फॉर्म अचूक भरावा, ज्यामध्ये मृत व्यक्ती आणि वारसदाराचा संपूर्ण तपशील असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे जमा करणे: अर्जासोबत खातेदाराचा अधिकृत मृत्यू दाखला (Death Certificate), तसेच दावा करणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा (Kyc Documents) सादर करावा.
ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत बँकेला रक्कम वारसदाराच्या खात्यात वर्ग करावी लागेल. या मुदतीत निपटारा न झाल्यास बँकेला त्याचे वाजवी कारण देणे बंधनकारक असेल.
मुदत ठेवीवर (FD) कोणतीही पेनल्टी नाही: मुदत संपण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास आणि वारसदाराला ती FD वेळेआधी बंद करायची असल्यास, बँका त्यावर कोणताही दंड किंवा प्री-मॅच्युरिटी पेनल्टी आकारू शकणार नाहीत.
लॉकरमधील वस्तूंचा त्वरित ताबा: बँक खात्यांप्रमाणेच लॉकरमधील दागिने, कागदपत्रे किंवा इतर मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी हयात जोडीदार किंवा नोंदणीकृत नॉमिनीला हेच सुलभ नियम लागू होतील.
रिझर्व्ह बँकेचा हा पुढाकार भारतीय बँकिंग व्यवस्थेला अधिक संवेदनशील आणि पारदर्शक बनवणारा ठरत आहे. अनपेक्षित प्रसंगी कुटुंबाची आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या सर्व बँक खात्यांमध्ये, मुदत ठेवींमध्ये आणि लॉकर्समध्ये योग्य नॉमिनीचे नाव वेळेत अपडेट करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
अधिकृत माहितीसाठी आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी नागरिक रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://rbikehtahai.rbi.org.in/rbi-settlement-of-deceased-claims.html) भेट देऊ शकतात.
"जाणकार बना, सतर्क रहा!"