रत्नागिरी जिल्ह्यात सायबर फसवणुकीचा आंतरराज्यीय कट; १० गुन्ह्यांसह पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन 
Arth Warta

रत्नागिरीतील बँक खात्यांचा वापर करून ऑनलाईन दरोडे!

रत्नागिरीत सायबर भामट्यांचा धुमाकूळ! 'म्युल अकाउंट्स'चा वापर करत कोट्यवधींचा डल्ला; एकाच दिवसात १० गुन्हे दाखल

Prachi Tadakhe

रत्नागिरी: डिजिटल व्यवहारांचा विस्तार जितक्या वेगाने होत आहे, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगारांचे जाळेही अधिक गडद होऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात याच सायबर भामट्यांनी मोठा दरोडा टाकला असून, 'म्युल अकाउंट्स'चा (Mule Accounts) वापर करून देशभरातील अनधिकृत आणि फसवणुकीचे पैसे परस्पर बँक खात्यांमध्ये वळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रविवारी (१९ जुलै) एकाच दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये तब्बल १० वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याने पोलीस प्रशासनासह बँक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की प्रकार काय आहे?

जानेवारी २०२६ पासून जिल्ह्यात या सायबर फसवणुकीचा खेळ सुरु असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भामट्यांनी स्थानिक नागरिकांच्या बँक खात्यांचा किंवा बनावट माहितीच्या आधारे उघडलेल्या खात्यांचा (ज्याला तांत्रिक भाषेत म्युल अकाउंट्स म्हटले जाते) गैरवापर केला.

देशभरात ज्या ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या घटना घडत होत्या, त्यातून लाटलेला पैसा लपवण्यासाठी आणि तो पांढरा करण्यासाठी रत्नागिरीतील या बँक खात्यांचा 'सेफ हॅवन' सारखा वापर केला गेला.

या संपूर्ण प्रकरणाचे धागेधोरे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शिवाजीनगर शाखेशी जोडले गेले आहेत. या शाखेतील एका संशयित खातेदाराच्या खात्यावरून देशभरातील विविध भागात नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली मोठी रक्कम हाताळली गेल्याचे समोर आले आहे.

काय असते 'म्युल अकाउंट'?

सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांची कागदपत्रे चोरून त्यांच्या नावे बँक खाती उघडतात. चोरीचा किंवा फसवणुकीचा पैसा थेट स्वतःच्या खात्यात न घेता, या तिसऱ्याच व्यक्तीच्या (Mule) खात्यावर वळवला जातो, जेणेकरून पोलिसांच्या तपासात मूळ गुन्हेगार सहजासहजी हाती लागू नये.

पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर; ७ तालुक्यांत धडक कारवाई

या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेधोरे समोर आल्यानंतर रत्नागिरी पोलीस दल तातडीने कामाला लागले आहे. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये १० गुन्हे नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत.

ही खाती नक्की कोणाच्या सांगण्यावरून उघडण्यात आली? यामागे स्थानिक दलाल आहेत की आंतरराज्यीय टोळी? आणि यामध्ये बँकेच्या यंत्रणेतील ढिसाळपणा कारणीभूत आहे का? या सर्व बाजूंचा पोलीस कसून तपास करत आहेत.

रत्नागिरीसारख्या शांत आणि निसर्गरम्य जिल्ह्यात असा हायटेक गुन्हा घडणे हे धोक्याची घंटा आहे. आजकाल कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून अनेक तरुण किंवा गरजू नागरिक आपली बँक खाती, एटीएम कार्ड आणि ओटीपी (OTP) अनोळखी व्यक्तींच्या हाती सोपवतात. हीच बाब सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहे.

बँक प्रशासनाने देखील नवीन खाती उघडताना 'केवायसी' (KYC) नियमांचे कडक पालन करणे गरजेचे आहे. एखाद्या खात्यात अचानक संशयास्पद आणि मोठ्या रक्कमेची उलाढाल होत असेल, तर रेड फ्लॅग (Red Flag) सिस्टीम तत्काळ सक्रिय व्हायला हवी.

पोलीस प्रशासन या प्रकरणी सूत्रधारांपर्यंत पोहचेलच, परंतु सामान्य नागरिकांनीही "आपले बँक खाते, आपली जबाबदारी" हे सूत्र लक्षात ठेवणे काळाची गरज बनले आहे.

SCROLL FOR NEXT