नवी दिल्ली / पुणे : भारतीय सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ (Excellence in Business Growth Award) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल अशोकमध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यांतील सहकार क्षेत्रातील सुमारे ४०० मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने उपाध्यक्ष श्री. सुभाष नाडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते आणि माजी अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अमृत महोत्सवी वर्षात अनेक लोकोपयोगी उपक्रम - ॲड. सुभाष मोहिते
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बँकेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करताना बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते म्हणाले की, “ग्राहकांचा वाढता विश्वास हीच बँकेच्या यशाची खरी पावती आहे. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व ग्राहकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याचा आमचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. भविष्यातही ग्राहकांना अधिक दर्जेदार व आधुनिक सेवा देत प्रगतीची घोडदौड कायम ठेवण्याचा बँकेचा निर्धार आहे.”
तसेच, गरज भासल्यास छोट्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेण्यासाठीही बँक पूर्णपणे सक्षम असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेमुळे यश - सुभाष नाडे
या यशामागील प्रमुख घटक स्पष्ट करताना बँकेचे उपाध्यक्ष श्री. सुभाष नाडे यांनी सांगितले की, “आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब, पारदर्शक व्यवहारपद्धती आणि समर्पित ग्राहकसेवा या त्रिसूत्रीमुळे बँकेने प्रगतीचा हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच बँकेची ही यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे.”
सामुदायिक प्रयत्नांचा गौरव
या पुरस्कारामुळे पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची व्यावसायिक प्रगती, सक्षम व्यवस्थापन आणि ग्राहककेंद्री कार्यपद्धतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. हा सन्मान म्हणजे बँकेच्या संचालक मंडळासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि बँकेवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो ग्राहकांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना बँक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.