व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका फाईलमुळे बँक खाते झाले रिकामे; सायबर भामट्यांची नवीन शक्कल. 
Arth Warta

Digital Robbery: गॅस बिल थकल्याची भीती दाखवून डॉक्टरची १० लाखांची लूट

महानगर गॅसचे नाव सांगून सायबर चोरट्यांनी घातला दरोडा; चेंबूरमधील खळबळजनक घटना.

Prachi Tadakhe

मुंबई: डिजिटल युगात सुविधांसोबतच फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. चेंबूरमधील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरला 'महानगर गॅस'चे बिल थकित असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी तब्बल ९ लाख ४९ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

चेंबूर परिसरात राहणारे डॉ. निलकमल टंडन यांना ८ एप्रिल रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्स एप वर मेसेज आला. "तुमचे फेब्रुवारी महिन्याचे गॅस बिल थकित आहे, ते त्वरित न भरल्यास गॅस कनेक्शन कापले जाईल," अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली होती. यानंतर भामट्याने डॉक्टरांना सतत फोन करून घाबरवण्यास सुरुवात केली.

केवळ १० रुपये भरून 'प्रोसेस अपडेट' करा, असे सांगत चोरट्याने डॉक्टरांना व्हॉट्सएप वर एक फाईल (APK File) पाठवली. डॉक्टरांनी ती फाईल उघडून व्यवहार करताच त्यांच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) आणि बँकेचे मेसेज येऊ लागले. काही वेळातच त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून सहा वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ९ लाख ४९ हजार रुपये लंपास करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे.

वाचकांसाठी महत्त्वाची सूचना:

  • कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या 'APK' फाईल्स डाऊनलोड करू नका.

  • गॅस किंवा वीज बिल भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपचाच वापर करा.

  • अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून पैशांचे व्यवहार टाळा.

SCROLL FOR NEXT