दिल्ली पोलिसांचे ढोंग रचून ७३ वर्षीय वृद्धाला १३ दिवसांत कंगाल केले; नक्की काय घडले? 
Arth Warta

मुंबईत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ७.८९ कोटींचा सायबर दरोडा

दिल्ली पोलिसांच्या नावाखाली भामट्यांनी १३ दिवसांत उकळली रक्कम; अंधेरी परिसरातील धक्कादायक प्रकार.

Prachi Tadakhe

सायबर गुन्हेगारांचे नवनवीन फंडे आणि 'डिजिटल अरेस्ट'ची वाढती भीती आता ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक ठरू लागली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका ७३ वर्षीय टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन तब्बल ७ कोटी ८९ लाख ५१ हजार ६३४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अवघ्या १३ दिवसांत ही मोठी रक्कम सायबर भामट्यांनी विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करून घेतली.

  1. ५ जुलै : पीडित ज्येष्ठ नागरिकाला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने स्वतःची ओळख 'दिल्ली पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी' अशी करून दिली.

  2. दहशतीचा बनाव : तक्रारदाराच्या शासकीय ओळखपत्राचा गैरवापर करून दिल्लीत एक बँक खाते उघडण्यात आले आहे आणि त्यातून सुमारे ७ कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत, असा दावा ठगाने केला.

  3. अटक वॉरंटची धमकी : तक्रारदाराने आपला या खात्याशी काहीही संबंध नसल्याचे वारंवार सांगितले; परंतु भामट्याने त्यांना थेट अटक वॉरंट पाठवून ‘तपासात सहकार्य न केल्यास तात्काळ अटक केली जाईल’ अशी धमकी दिली. तसेच, हे प्रकरण अतिशय गुप्त असल्याचे सांगून कुटुंबातील कोणालाही न सांगण्यासाठी त्यांच्यावर मानसिक दबाव आणला.

याच काळात 'निशा पटेल' नाव सांगणाऱ्या एका महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधला. आपण 'दिल्ली सायबर विभागातून' बोलत असल्याचे सांगून तिने तपासाच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यांचे तपशील, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी (Fixed Deposits) आणि इतर गुंतवणुकीची सर्व गोपनीय माहिती काढून घेतली.

"तपास पूर्ण होईपर्यंत आणि तुम्ही निर्दोष सिद्ध होईपर्यंत ही सर्व रक्कम शासकीय सुरक्षेसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांत ट्रान्स्फर करावी लागेल. चौकशीअंती सर्व पैसे परत मिळतील," असे आमिष तिला दाखवण्यात आले. घाबरलेल्या या वयस्कर व्यावसायिकानी ५ जुलै ते १८ जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने एकूण ₹७,८९,५१,६३४ भामट्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये जमा केले.

पैसे उकळल्यानंतरही ठगांकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती. सततच्या धमक्यांमुळे ज्येष्ठ नागरिक प्रचंड मानसिक तणावात होते. अखेर १७ जुलै रोजी वेस्ट एरिया सायबर सेलचे खरेखुरे पोलिस अधिकारी तुम्ही सायबर गुन्ह्याची शिकार झाला आहात हे सांगण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले असता, आपल्यासोबत एक मोठा सायबर फ्रॉड झाल्याची भीषण जाणीव तक्रारदाराला झाली.

त्यानंतर पीडित व्यावसायिकाने तात्काळ पोलीस ठाणे गाठून अज्ञात सायबर ठगांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. सध्या पोलीस संबंधित बँक खाती आणि फोन क्रमांकांच्या आधारे तपास करत आहेत.

भारतीय कायद्यामध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) नावाची कोणतीही संकल्पना किंवा प्रक्रिया अस्तित्त्वात नाही. पोलीस, सीबीआय (CBI), ईडी (ED), किंवा सायबर सेल कोणतीही कारवाई फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे किंवा 'ऑनलाईन अटक' करून करत नाही.

नागरिकांसाठी आवश्यक दक्षता:

  • घाबरू नका : कोणताही पोलीस अधिकारी फोनवरून पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगत नाही.

  • माहिती शेअर करू नका : अनोळखी व्यक्तीला किंवा कॉलवर आपल्या बँक खात्याची, गुंतवणुकीची माहिती देऊ नका.

  • तात्काळ संपर्क साधा : असा कोणताही संशयित कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवा.

SCROLL FOR NEXT