"एअर इंडिया महाराजा क्लबच्या नावाखाली लूट!" 
Arth Warta

'एअर इंडिया महाराजा क्लब'च्या नावाखाली निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला २.६५ लाखांचा गंडा!

बनावट लिंक आणि ओटीपी शेअर करणे पडले महागात; अंधेरीतील घटना

Prachi Tadakhe

मुंबई: सायबर भामट्यांच्या जाळ्यात आता सुशिक्षित आणि अनुभवी नागरिकही अडकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंधेरी (पश्चिम) येथे राहणाऱ्या एका ७३ वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी २.६५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. व्हॉट्सॲपवर आलेली एक बनावट लिंक आणि ओटीपी (OTP) शेअर केल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाला आपली आयुष्यभराची पुंजी गमवावी लागली.

नेमकी घटना काय?

तक्रारदार विजय मेश्राम यांनी ६ एप्रिल रोजी 'एअर इंडिया महाराजा क्लब' या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याचाच फायदा घेत दुसऱ्या दिवशी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सअॅप कॉल आला. आपण एअर इंडियामधून बोलत असल्याचे भासवून त्या व्यक्तीने मेश्राम यांची वैयक्तिक माहिती विचारली. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगण्यात आले आणि मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागितला. मेश्राम यांनी विश्वासाने ओटीपी देताच समोरच्या व्यक्तीने संपर्क तोडला.

बँक खात्यातून पैसे लंपास

काही दिवसांनंतर मेश्राम जेव्हा आपले वीजबिल भरण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता, ७ एप्रिल रोजी त्यांच्या विविध बँक खात्यांमधून ८९,१०० रुपये, ९९,००० रुपये आणि ७७,१०१ रुपये असे एकूण २.६५ लाख रुपये परस्पर काढले गेल्याचे उघड झाले.

सायबर हेल्पलाइनकडे धाव

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेश्राम यांनी तातडीने संबंधित बँकांना कळवून आपली खाती बंद केली आणि सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली.

महत्त्वाची खबरदारी (वाचकांसाठी टीप):

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP देऊ नका.

  • व्हॉट्सॲपवर आलेल्या संशयास्पद Links वर क्लिक करू नका.

  • बँकेचे व्यवहार करताना अधिकृत ॲपचाच वापर करा.

SCROLL FOR NEXT