कोल्हापूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून 'डिजिटल अरेस्ट'च्या (Digital Arrest) नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या सायबर भामट्यांचे जाळे आता अधिकच गंभीर वळण घेत आहे. 'मी विश्वास नांगरे-पाटील बोलतोय... तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून मोठा स्कॅम झाला आहे,' अशी भीती दाखवून कोल्हापुरातील एका ७५ वर्षीय निवृत्त लिपिकाला तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चंद्रकांत राणोजी माने (वय ७५, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत माने हे शासकीय सेवेतून निवृत्त झालेले लिपिक असून, नागाळा पार्क येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांची मुले कामानिमित्त बाहेरगावी असतात. १८ तारखेला दुपारी माने यांच्या मोबाईलवर एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःचे नाव रोहितकुमार सांगत, आपण मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासविले.
"तुमच्या आधार कार्डचा वापर करून मुंबईतील एका बँकेत बेकायदेशीर खाते उघडण्यात आले आहे आणि त्याद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे," असे सांगून या भामट्याने माने यांना घाबरवून सोडले. भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी व्हॉटस्ॲपवर बनावट अटक वॉरंट (Arrest Warrant) आणि इतर कायदेशीर कागदपत्रेही पाठवण्यात आली.
दुसऱ्या दिवशी माने यांना पुन्हा फोन आला. "आता आमचे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे-पाटील साहेब तुमच्याशी बोलतील," असे सांगून एका दुसऱ्या व्यक्तीने फोनवर संवाद साधला. 'तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे, पण आम्ही तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो,' असे सांगत या तोतया अधिकाऱ्याने माने यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर सोमवार, २० तारखेला भामट्यांनी माने यांच्यावर दबाव वाढवला आणि पोस्टातील १५ लाख रुपयांची मुदतठेव (FD) मोडून ती रक्कम तत्काळ हिमाचल प्रदेशातील एका बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. भीतीपोटी माने यांनी मंगळवारी आरटीजीएस (RTGS) द्वारे ही संपूर्ण रक्कम संबंधित खात्यावर वर्ग केली.
रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर भामट्यांनी सावधगिरी बाळगत माने यांच्या मोबाईलवर आलेले बँक ट्रान्सफरचे सर्व मेसेज स्वतःच्या नंबरवर मागवून घेतले. "पाठवलेली ही रक्कम पडताळणीसाठी रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पाठवली असून, दोन दिवसांत ती तुमच्या खात्यात परत जमा होईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
परंतु दोन दिवसांनंतरही पैसे परत न आल्याने माने यांनी संबंधित नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व फोन बंद आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माने यांनी शाहूपुरी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस किंवा कोणतीही तपासी यंत्रणा कधीही व्हॉटस्ॲपवर व्हिडिओ कॉल करून अथवा बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून अटक करत नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास अजिबात घाबरू नका, तात्काळ संभाषण तोडा आणि १९३० (1930) या सायबर हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा.