जुनी टॅक्स रिजीम हवीये? मग 'या' ३ डेडलाईन्स चुकवू नका! 
Arth Warta

ITR Deadline 2026: जुलै महिन्यात 'या' ३ तारखा चुकल्या, तर थेट दंड!

नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी जुलै महिना महत्त्वाचा; नवीन की जुनी टॅक्स रिजीम? ३१ जुलैपूर्वी आयटीआर फाईल न केल्यास गमवावा लागेल 'हा' मोठा पर्याय.

Prachi Tadakhe

मुंबई: टॅक्सपेअर्ससाठी (करदात्यांसाठी) जुलै महिना हा वर्षातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा महिना मानला जातो. चालू वर्ष २०२६ चा जुलै महिनाही याला अपवाद नाही. तुम्ही जर नोकरदार असाल, पेन्शनधारक असाल किंवा व्यावसायिक असाल, तर तुमच्यासाठी कर भरण्याच्या दृष्टीने उलटcount (काउंटडाऊन) सुरू झाला आहे.

जुलै महिन्यात इनकम टॅक्स रीटर्न (ITR) फाईल करण्यासोबतच टीडीएस (TDS) पेमेंट आणि इतर महत्त्वाचे फॉर्म जमा करण्याच्या अंतिम मुदती आहेत. या मुदती पाळल्या नाहीत, तर तुम्हाला मोठा आर्थिक दंड आणि व्याजाचा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे वेळेत कामे आटोपण्यासाठी या ३ महत्त्वाच्या तारखा डायरीत नोंदवून ठेवा.

१. ७ जुलै २०२६ : टीडीएस (TDS) जमा करण्याची शेवटची तारीख

जुलै महिन्याची पहिली मोठी डेडलाईन ७ जुलै ही आहे. ही तारीख प्रामुख्याने टीडीएस भरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

  • जून २०२६ मधील TDS: जून २०२६ या महिन्यात कापलेला टीडीएस सरकारी खात्यात जमा करण्याची अंतिम तारीख ७ जुलै आहे.

  • तिमाही टॅक्स: ज्या असेसिंग ऑफिसर्सनी करदात्यांना त्रैमासिक (तिमाही) तत्त्वावर टीडीएस जमा करण्याची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी एप्रिल-जून २०२६ या तिमाहीचा टॅक्स जमा करण्याची शेवटची संधी हीच असेल.

  • फॉर्म डिक्लेरेशन: जून महिन्यात खरेदीदारांकडून मिळालेल्या 'फॉर्म १२७' चे डिक्लेरेशन आणि जून तिमाहीत मिळालेल्या 'फॉर्म १२१' चे डिक्लेरेशन अपलोड करण्याची अंतिम मुदत देखील ७ जुलै आहे.

२. ३० जुलै २०२६ : विशेष व्यवहारांचे चालान (Special Transaction)

जर तुम्ही जून २०२६ मध्ये एखाद्या विशेष व्यवहारावर (Special Transaction) टीडीएस कापला असेल, तर ही तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अशा करदात्यांना 'फॉर्म १४१' मध्ये चालान-कम-स्टेटमेंट (Challan-cum-Statement) भरण्यासाठी ३० जुलै २०२६ पर्यंतची अंतिम वेळ देण्यात आली आहे. ही तारीख विसरल्यास प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

३. ३१ जुलै २०२६ : आयटीआर (ITR) फाईलिंगची अंतिम मुदत

हा जुलै महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. नोकरदार वर्ग, पेन्शनधारक किंवा ज्यांचा कोणताही व्यवसाय नाही, अशा सर्व सामान्य करदात्यांसाठी आयटीआर फाईल करण्याची ही शेवटची तारीख आहे.

  • कोणते फॉर्म भरायचे?: या करदात्यांना ITR-1 किंवा ITR-2 द्वारे आपला टॅक्स रीटर्न ३१ जुलै २०२६ पर्यंत जमा करावा लागेल.

  • व्यावसायिकांसाठी सूट: दरम्यान, नॉन-ऑडिट बिझनेस आणि फ्रीलान्सर्ससाठी (Freelancers) ही तारीख ३१ ऑगस्ट २०२६ अशी असणार आहे.

डेडलाईन चुकली... तर काय होईल?

जर तुम्ही ३१ जुलै २०२६ या अंतिम तारखेपर्यंत तुमचा आयटीआर फाईल केला नाही, तर तुम्हाला खालीलप्रमाणे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल:

  • लेट फी (विलंब शुल्क): ५ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास ५,००० रुपये आणि ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास १,००० रुपये लेट फी भरावी लागेल.

  • व्याज आकारणी: आयटीआर उशिरा भरल्यास थकीत करावर (Outstanding Tax) सेक्शन २३४A अंतर्गत दरमहा १ टक्का दराने व्याज द्यावे लागेल.

  • जुनी टॅक्स रिजीम बंद: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही ३१ जुलैची डेडलाईन चुकवली, तर तुम्हाला जुन्या टॅक्स रिजीमचा (Old Tax Regime) पर्याय निवडता येणार नाही. तुम्हाला सक्तीने नवीन टॅक्स रिजीमच्या (New Tax Regime) नियमांनुसारच टॅक्स भरावा लागेल, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

आयटीआर फाईल करताना शेवटच्या क्षणी होणारी घाई आणि सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या टाळण्यासाठी करदात्यांनी ३१ जुलैची वाट न पाहता आपली कागदपत्रे गोळा करून आत्ताच आयटीआर फाईल करावा, जेणेकरून दंडात्मक कारवाईतून सुटका होईल.

SCROLL FOR NEXT