रोख व्यवहार की बँक ट्रान्सफर? टॅक्स नोटीसपासून वाचण्यासाठी कर सल्लागारांचा महत्त्वाचा सल्ला. 
Arth Warta

रोख व्यवहार की बँक ट्रान्सफर? ITAT च्या ताज्या निकालाने संभ्रम केला दूर!

घर खरेदीसाठी आईने दिलेले ५.७२ लाख रुपये 'अघोषित' मानण्यास कोर्टाचा नकार; बँक ट्रान्सफर ठरणार गेमचेंजर.

Prachi Tadakhe

पालक आपल्या मुलांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असतात. मग ते मुलांचे उच्च शिक्षण असो, नवीन घर खरेदी असो वा एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे असो, आई-वडील नेहमीच आर्थिक मदत करत असतात. मात्र, अशा वेळी अनेकदा करदात्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो - "आईकडून मिळालेले पैसे किंवा गिफ्ट इन्कम टॅक्सच्या कक्षेत येतात का? त्यावर कर भरावा लागतो का?"

या संदर्भात नुकताच हैदराबाद इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनलने (ITAT) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, ज्यामुळे कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हैदराबाद न्यायाधिकरणासमोर नुकतेच एक प्रकरण आले होते. यामध्ये एका व्यक्तीने नवीन घर खरेदी करण्यासाठी आपल्या आईकडून ५.७२ लाख रुपयांची आर्थिक मदत घेतली होती. स्क्रुटिनी (चौकशी) दरम्यान प्राप्तिकर विभागाने या रकमेवर आक्षेप घेतला आणि ही गुंतवणूक 'अघोषित' (Unexplained Investment) मानून त्यावर कर आकारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संबंधित करदात्याने ही रक्कम त्याच्या आईने दिली असल्याचे स्पष्ट करत बँकेचे रेकॉर्ड्स आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली. यावर सुनावणी करताना ITAT ने स्पष्ट केले की, जर पैशांचा स्रोत (Source) स्पष्ट असेल, पैसे देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटत असेल आणि व्यवहाराची योग्य नोंद उपलब्ध असेल, तर त्याला 'अघोषित गुंतवणूक' मानले जाऊ शकत नाही. न्यायाधिकरणाने कर विभागाची कारवाई अयोग्य ठरवत करदात्याच्या बाजूने निकाल दिला.

इन्कम टॅक्स ॲक्टचे 'कलम ६९' (Section 69) अशा प्रकरणांमध्ये लागू होते, जिथे एखादी व्यक्ती आपल्या गुंतवणूक किंवा मालमत्तेसाठी वापरलेल्या पैशांचा कायदेशीर स्रोत सांगू शकत नाही. जर तुम्ही स्रोताचा पुरावा देऊ शकला नाहीत, तर प्राप्तिकर विभाग ती रक्कम तुमचे 'अघोषित उत्पन्न' मानून त्यावर मोठा दंड आणि कर लावू शकतो.

मात्र, जर हे पैसे आई किंवा प्राप्तिकर कायद्यानुसार 'जवळच्या नातेवाईकांच्या' श्रेणीत येणाऱ्या व्यक्तीकडून मिळाले असतील आणि त्याचे वैध पुरावे असतील, तर कलम ६९ अंतर्गत कोणतीही कारवाई केली जात नाही.

कोणती कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे?

आई, वडील किंवा जवळच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत अथवा मोठी भेटवस्तू घेताना भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी खालील कागदपत्रे नेहमी तयार ठेवावीत:

  • गिफ्ट डीड किंवा गिफ्ट लेटर: पैसे किंवा भेटवस्तू ही 'भेट' म्हणूनच दिली आहे, हे स्पष्ट करणारे एक लेखी संमतीपत्र (Gift Deed).

  • बँकिंग रेकॉर्ड्स: बँक ट्रान्सफरचे रेकॉर्ड, पासबुक एन्ट्री किंवा बँक स्टेटमेंट.

  • उत्पन्नाचा स्रोत: पैसे देणाऱ्या व्यक्तीच्या (उदा. आईच्या) उत्पन्नाचा किंवा बचतीचा वैध पुरावा (आवश्यकता भासल्यास).

भारतीय प्राप्तिकर कायद्यानुसार, रक्ताच्या किंवा जवळच्या नातेवाईकांकडून मिळणाऱ्या भेटवस्तू (Gifts) करमुक्त आहेत. मात्र, 'करमुक्त' असणे म्हणजे 'चौकशीतून सूट' असा होत नाही. हैदराबाद ट्रिब्यूनलच्या या निर्णयाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कर रचनेत पारदर्शकता किती महत्त्वाची आहे.

करदात्यांनी खालील गोष्टींची काळजी नक्की घ्यावी:

१. रोख व्यवहार टाळा: नातेवाईकांकडून कितीही मोठी रक्कम घेताना ती रोखीने (Cash) न घेता नेहमी बँक ट्रान्सफर (Cheque, NEFT, IMPS) द्वारेच घ्यावी.

२. कागदपत्रांची पूर्तता: व्यवहार कितीही घरगुती असला, तरी त्याचे दस्तऐवजीकरण (Documentation) चोख असावे.

३. तज्ज्ञांचा सल्ला: व्यवहाराची रक्कम मोठी असल्यास, एखादा कायदेशीर व्यवहार करण्यापूर्वी कर सल्लागाराचा (Tax Consultant) सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.

जर तुमच्या व्यवहाराचा मार्ग स्वच्छ असेल आणि तुमच्याकडे योग्य कागदपत्रे असतील, तर आईकडून मिळालेल्या प्रेमाच्या अन् पैशांच्या भेटीवर प्राप्तिकर विभाग कोणताही कर लावू शकत नाही.

SCROLL FOR NEXT