मॅकिन्सेच्या 'ग्लोबल बँकिंग ॲन्युअल रिव्ह्यू २०२६: प्रिसिजन विथ स्पीड' या अहवालात असे नमूद केले आहे की, ग्राहक आता बचत खात्यांचे व्याजदर तपासण्यासाठी किंवा कर्ज योजनांची माहिती घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याऐवजी किंवा रिलेशनशिप मॅनेजरशी बोलण्याऐवजी ChatGPT, Claude आणि Gemini यांसारख्या एआय प्लॅटफॉर्मची मदत घेत आहेत. या बाबतीत भारताने जागतिक स्तरावर आघाडी घेतली असून, ब्राझील (३६ टक्के), मेक्सिको (३५ टक्के), यूके (२५ टक्के) आणि अमेरिका (२० टक्के) भारताच्या बरेच मागे आहेत. अहवालात म्हटल्याप्रमाणे, प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार आजही बँकेतच होत असले, तरी त्या व्यवहाराला आकार देणारी प्राथमिक चर्चा मात्र बँकेबाहेरील एआय प्लॅटफॉर्मवर होऊ लागली आहे. यामुळे ग्राहकांशी होणारा पहिला थेट संवाद तुटण्याचा धोका बँकांसमोर निर्माण झाला आहे.
जागतिक स्तरावर बँकिंग कामांसाठी एआय वापरणाऱ्यांपैकी ७४ टक्के ग्राहक बाह्य एआय प्लॅटफॉर्म्सना पसंती देतात, जे बँकांच्या स्वतःच्या चॅटबॉट्स वापरणाऱ्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. ईवाय इंडियाच्या 'कस्टमर एक्सपीरियन्स रीइमॅजिन्ड २०२६' या २,०३० ग्राहकांच्या सर्वेक्षणातून भारतीय बँकांच्या डिजिटल सेवेतील उणिवा स्पष्टपणे समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार केवळ २५ टक्के ग्राहकांनी आपला बँकिंग अनुभव उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. उर्वरित ५५ टक्के ग्राहकांना ॲप्स आणि वेबसाइट्सवर सुधारित डिजिटल सपोर्ट हवा आहे, तर ४८ टक्के ग्राहकांना जलद प्रतिसाद आणि स्पष्ट संवाद अपेक्षित आहे.
विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागातील सहकारी बँका व पतसंस्थांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे, ४४ टक्के ग्राहकांना प्रादेशिक भाषा सहाय्याची गरज वाटते, तर ४१ टक्के ग्राहकांना अधिक सक्षम तक्रार निवारण प्रणाली हवी आहे. याशिवाय ४९ टक्के उदयोन्मुख व्यावसायिक आणि ५१ टक्के मध्यमवयीन उद्योजक खर्चाचे विश्लेषण आणि बजेटिंगसाठी स्मार्ट डिजिटल साधनांना प्राधान्य देत आहेत.
एआय प्रणाली आता केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार पार पाडण्यापर्यंत विकसित होत आहेत. ७२ टक्के एआय वापरकर्ते एआय एजंटला आर्थिक कामे करण्याची परवानगी देण्यास तयार आहेत; मात्र कोणताही व्यवहार करण्यापूर्वी एजंटने ग्राहकाची परवानगी घ्यावी आणि स्वयंचलित मंजुरीची मर्यादा ५०० डॉलरपर्यंतच असावी, अशी बहुतांश ग्राहकांची इच्छा आहे.
मॅकिन्सेने या संकल्पनेला 'परवानगी मागणारा सक्षम प्रतिनिधी' असे संबोधले आहे. असे असले तरी, गुंतागुंतीच्या आर्थिक निर्णयांसाठी आजही मानवी सल्ल्यालाच अधिक महत्त्व दिले जाते. मूलभूत आर्थिक प्रश्नांसाठी ५९ टक्के लोक एआयला पसंती देतात; परंतु गुंतवणुकीच्या सल्ल्यासाठी केवळ २४ टक्के लोक एआयवर अवलंबून राहतात, तर ३४ टक्के लोक मानवी सल्लागाराला आणि ४२ टक्के लोक दोन्ही पर्यायांना पसंती देतात. तसेच दोन-तृतीयांश ग्राहक प्रतीक्षा करावी लागली तरी व्हॉइस बॉटऐवजी प्रत्यक्ष व्यक्तीशी बोलणे पसंत करतात. विशेषतः ४६ ते ५९ वयोगटातील निम्म्या ग्राहकांचा कल आजही प्रत्यक्ष संवादाकडेच आहे, जी सहकारी बँका आणि पतसंस्थांसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
एआयच्या वाढत्या वापरासोबतच डेटा गोपनीयता, चुकीचा सल्ला आणि अल्गोरिथमिक पक्षपाताचे धोकेही वाढले आहेत. ३७ टक्के ग्राहकांना तृतीय-पक्ष एआय प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक आर्थिक माहिती सुरक्षित राहील का, याची चिंता वाटते, तर ३८ टक्के ज्येष्ठ ग्राहकांना एआयची उत्तरे गोंधळात टाकणारी असण्याची भीती वाटते.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 'फ्री-एआय' (FREE-AI) समितीच्या अहवालातही या धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. १२७ वित्तीय संस्थांच्या सर्वेक्षणात केवळ १८ टक्के संस्थांकडे ऑडिट लॉग आणि १० टक्के संस्थांकडे पक्षपात-निवारण प्रोटोकॉल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच ८५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी डेटा गोपनीयता आणि बाह्य लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (LLMs) वापरावर कडक नियामक चौकटीची मागणी केली आहे. विश्वास, निष्पक्षता, उत्तरदायित्व, स्पष्टता आणि सुरक्षितता या सात तत्त्वांवर बँकांनी आपले एआय धोरण आखावे, अशी शिफारस रिझर्व्ह बँक समितीने केली आहे.
सहकारी आणि व्यावसायिक बँकांसाठी पुढील दिशा
जर बँकांनी काळानुरूप सक्षम आणि सुरक्षित एआय सेवा दिल्या नाहीत, तर सुमारे निम्मे ग्राहक तृतीय-पक्ष फिनटेक ॲप्सकडे वळू शकतात. मात्र, भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी आशेचा मोठा किरण म्हणजे आजही ६२ टक्के ग्राहक बाह्य प्लॅटफॉर्मऐवजी त्यांच्या प्राथमिक बँकेकडूनच एआय आधारित सल्ला घेणे अधिक सुरक्षित मानतात.
सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे असलेला 'ग्राहकांशी थेट आणि जिव्हाळ्याचा संवाद' हा त्यांचा सर्वात मोठा यूएसपी (USP) आहे. व्यावसायिक बँका तंत्रज्ञानात आघाडीवर असल्या तरी, सहकारी बँकांनीही रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरक्षित डिजिटल साधने आणि प्रादेशिक भाषेतील स्मार्ट ग्राहक सेवा सुरू केल्यास त्या मोठ्या स्पर्धकांना सहज टक्कर देऊ शकतात. मानवी विश्वासाला आधुनिक डेटा आणि एआयची जोड देत 'रिलेशनशिप बँकिंग'कडून 'इंटेलिजन्स बँकिंग'कडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या बँकाच आगामी काळात ग्राहकांच्या मनावर राज्य करतील.