Arth Warta

इचलकरंजीत 'बिजनेस ई-मेल हॅकिंग'चा मोठा प्रकार उघडकीस

परदेशी पुरवठादाराचा बनाव करत भामट्यांनी आखला कट; व्यवसायिकांनी कशी घ्यावी काळजी?

Prachi Tadakhe

इचलकरंजी : उद्योगनगरी इचलकरंजीत सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा औद्योगिक संस्थांकडे वळवल्याचे समोर आले आहे. एका व्यापाऱ्याचा ई-मेल आयडी हॅक करून, परदेशी पुरवठादार कंपनीचे बँक खाते बदलल्याचा बनाव करत उद्योजकाची तब्बल १९ लाख ३३ हजार २६६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजत राजेंद्रकुमार राठी (वय ३९, रा. रामकृष्णनगर, इचलकरंजी) असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. राठी यांची 'मिरॅकल इंडस्ट्रीज' नावाने औद्योगिक फर्म असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक व्यवहार करतात.

अशी झाली फसवणूक

सायबर गुन्हेगारांनी प्रथम 'मिरॅकल इंडस्ट्रीज'चा ई-मेल आयडी हॅक करून त्यांच्या नियमित व्यावसायिक व्यवहारांची माहिती मिळवली. त्यानंतर २९ जून ते १५ जुलै या कालावधीत, राठी यांच्याशी नियमित व्यापार करणाऱ्या परदेशी कंपनीच्या नावानेच हुबेहूब मिळता-जुळता ई-मेल पाठवला.

संबंधित परदेशी कंपनीच्या नेहमीच्या बँक खात्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगत, भामट्यांनी 'डीके इंटरप्रायझेस एलएलसी' (DK Enterprises LLC) या नावाने नवीन 'प्रोफॉर्मा इनव्हाईस' (Proforma Invoice) आणि 'बँक ऑफ अमेरिका'चे (Bank of America) खात्याचे तपशील ई-मेलद्वारे पाठवले.

नियमित पुरवठादाराकडूनच ई-मेल आल्याचा गैरसमज झाल्याने राठी यांनी विश्वासाने २२ हजार २२५ अमेरिकन डॉलर्स (सुमारे १९ लाख ३३ हजार २६६ रुपये) दर्शवलेल्या नवीन खात्यावर वर्ग केले.

असा उघडकीस आला प्रकार

पैसे भरल्यानंतरही संबंधित मालाचा पुरवठा न झाल्याने राठी यांनी आपल्या मूळ परदेशी पुरवठादाराशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी असा कोणताही ई-मेल किंवा नवीन बँक खाते तपशील पाठवला नसल्याचे स्पष्ट केले. ई-मेल हॅक करून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राठी यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन फिर्याद नोंदवली.

उद्योजकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

सायबर गुन्हेगार सध्या Business Email Compromise (BEC) या तंत्राचा वापर करून कंपन्यांची फसवणूक करत आहेत. परदेशी किंवा स्थानिक पुरवठादारांकडून बँक खाते बदलण्याबाबतचा ई-मेल आल्यास, केवळ ई-मेलवर विश्वास न ठेवता संबंधित कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी फोनवरून थेट खातरजमा करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT