नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कारभारात डिजिटल क्रांतीचे वारे वाहत असतानाच, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील तब्बल ३० लाख ९१ हजार ८६२ निष्क्रिय ईपीएफ (EPF) खात्यांमध्ये सुमारे ९,३३० कोटी रुपयांचा निधी दाव्याविना (Unclaimed) पडून असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
ईपीएफओ आपल्या सेवा अधिक आधुनिक आणि सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. २०२६ च्या ईपीएफ योजनांच्या अंमलबजावणीद्वारे प्रक्रिया डिजिटल केली जात असताना, दुसरीकडे लाखो कर्मचाऱ्यांची निवृत्तीची पुंजी आजही निष्क्रिय खात्यांच्या विळख्यात अडकलेली आहे. या प्रचंड रकमेमुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खाती निष्क्रिय का होतात?
तज्ज्ञांच्या मते, खालील कारणांमुळे ही खाती निष्क्रिय झाली आहेत:
नोकरी बदल: नोकरी बदलल्यानंतर जुन्या ईपीएफ खात्याचे नवीन खात्यात हस्तांतरण (Transfer) न करणे.
योगदानाचा अभाव: दीर्घकाळ खात्यात कोणत्याही प्रकारचे नवीन योगदान (Contribution) जमा न होणे.
निवृत्तीनंतरचे दुर्लक्ष: निवृत्तीनंतर आपला निधी काढण्यासाठी क्लेम न करणे.
तांत्रिक अडचण: युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) प्रणाली लागू होण्यापूर्वीची जुनी खाती विस्मरणात जाणे.
नामांकनाचा अभाव: खातेधारकाच्या निधनानंतर वारसदार किंवा नामनिर्देशित व्यक्तींनी दाव्यासाठी पुढाकार न घेतल्याने मोठी रक्कम खात्यातच पडून राहते.
३ आयआयटी उभारता येतील एवढा निधी!
या निष्क्रिय रकमेचे गांभीर्य लक्षात घेण्यासाठी एक तुलनात्मक उदाहरण समोर आले आहे. २०२६ च्या महागाई दरानुसार, एका आयआयटी (IIT) उभारणीचा अंदाजे खर्च २,९३४ कोटी रुपये गृहीत धरल्यास, या ९,३३० कोटी रुपयांतून देशात तीन नवीन आयआयटी उभारता येतील आणि तरीही ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम शिल्लक राहील.
एवढी मोठी रक्कम अद्यापही दाव्याच्या प्रतीक्षेत असल्याने, ईपीएफओ यावर काय ठोस पावले उचलते आणि खातेदारांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी कोणती मोहीम राबवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.