बँकांचे पर्याय: पर्सनल लोन ते बॅलन्स ट्रान्सफर 
Arth Warta

कर्ज ॲप्सच्या विळख्यातून सुटका: बँक देईल का मदतीचा हात?

कर्ज एकत्रीकरणात व्यावसायिक व सहकारी बँका कशी मदत करू शकतात?

Prachi Tadakhe

आर्थिक तातडीच्या काळात अनेक जण कोणतीही मोठी कागदपत्रे न देता झटपट रक्कम देणाऱ्या कर्ज ॲप्सचा आधार घेतात. सुरुवातीला ही प्रक्रिया सोपी आणि वेगवान वाटते; मात्र जास्त व्याजदर, छुपे शुल्क आणि अल्प कालावधीच्या परतफेडीच्या अटींमुळे कर्जदारावर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो.

काही अनियमित किंवा संशयास्पद ॲप्सकडून ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा आणि फोनमधील संपर्क यादीचा गैरवापर होण्याच्या घटनाही समोर येतात. थकबाकी किंवा विलंब झाल्यास धमकीचे संदेश, फोन आणि मित्र-परिवार किंवा नातेवाईकांना संपर्क साधून दबाव आणण्याचे प्रकार घडतात. परिणामी, मुद्दल कमी होण्याऐवजी व्याज आणि दंडात्मक शुल्कातच उत्पन्नाचा मोठा भाग खर्च होतो आणि कर्जदार कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो.

कर्ज एकत्रीकरण म्हणजे काय?

अनेक छोट्या आणि महागड्या कर्जांऐवजी ती सर्व कर्जे एकत्र करून एकच नियोजनबद्ध कर्ज घेणे म्हणजे कर्ज एकत्रीकरण. वेगवेगळ्या ॲप्सचे हप्ते आणि तारखा सांभाळण्याऐवजी ग्राहकास एकाच कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) भरावा लागतो.

यामुळे परतफेडीचा कालावधी आणि रक्कम अधिक स्पष्ट होते व मासिक नियोजन करणे सोपे जाते. मात्र, कर्ज एकत्रीकरण केल्याने कर्ज पूर्णपणे माफ होत नाही किंवा शिल्लक राहिलेली रक्कम नाहीशी होत नाही; केवळ रकमेची पुनर्रचना होऊन आर्थिक शिस्त लावण्यास मदत होते.

बँक कशा प्रकारे मदत करू शकते?

कर्जदाराच्या आर्थिक स्थितीनुसार आणि गरजेनुसार बँकांकडून खालील पर्याय उपलब्ध होऊ शकतात:

  • वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन): सिबिल (CIBIL) स्कोअर चांगला असेल आणि नियमित उत्पन्न असेल, तर बँकेकडून तुलनेने कमी व्याजदरात एक मोठे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. या रकमेतून कायदेशीर ॲप्सची छोटी-मोठी कर्जे एकाच वेळी बंद करणे शक्य होते.

  • तारण कर्ज (सोन्यावर किंवा मालमत्तेवर कर्ज): अनेक ॲप्सवरून कर्ज घेतल्यामुळे सिबिल स्कोअर खालावला असल्यास, विनातारण कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते. अशा वेळी गोल्ड लोन (सोन्यावर कर्ज), मालमत्ता गहाण कर्ज किंवा मुदत ठेवीवर (FD) कर्ज घेऊन महागडी ॲप कर्जे फेडण्याचा पर्याय विचारात घेतला जातो.

  • क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर: कार्डद्वारे किंवा क्रेडिट लाईन ॲप्सद्वारे घेतलेली रक्कम बँकेच्या दुसऱ्या कार्डवर किंवा ईएमआय (EMI) सुविधेत रूपांतरित करून मासिक हप्त्याचे नियोजन करता येते.

सहकारी बँकेतून कर्ज एकत्रीकरण कसे होऊ शकते?

ग्राहक ज्या सहकारी बँकेचे खातेदार किंवा सभासद आहेत, तेथून स्थानिक पातळीवर आणि नातेसंबंध व व्यवहारानुसार खालील पर्याय मिळू शकतात:

  • जामीनदार तत्त्वावर वैयक्तिक कर्ज: काही मोठ्या किंवा व्यावसायिक बँकांमध्ये केवळ सिबिल स्कोअरवर भर दिला जातो. मात्र, सहकारी बँकांमध्ये सिबिल स्कोअर काहीसा कमी असला तरी दोन सक्षम जामीनदारांच्या आधारे वैयक्तिक कर्जाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

  • तारण कर्ज (गोल्ड लोन / मालमत्ता गहाण): सहकारी बँकांमध्ये सोने किंवा घर-जमिनीच्या कागदपत्रांवर (गहाणखत) तुलनेने कमी कागदपत्रांत आणि जलद कर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

  • मुदत ठेवीवर किंवा आवर्ती ठेवीवर कर्ज: स्वतःची किंवा कुटुंबातील व्यक्तीची बँकेत ठेव असल्यास, त्यावर तात्काळ कर्ज घेऊन ॲप्सची उच्च व्याजदराची कर्जे फेडता येतात.

सहकारी बँकेत अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

सहकारी बँकेकडे कर्ज एकत्रीकरणासाठी अर्ज करताना खालील बाबींची तयारी ठेवणे उपयुक्त ठरते:

  • सभासदत्व आणि शेअर्स: सहकारी बँकेतून कर्ज घेण्यासाठी संबंधित बँकेचे नाममात्र किंवा नियमित सभासदत्व आवश्यक असते. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम शेअर्स म्हणून ठेवावी लागते, जी कर्ज फेडल्यानंतर नियमानुसार परत मिळते.

  • सर्व कर्जांची यादी व स्टेटमेंट: बँकेत जाताना वापरत असलेल्या सर्व कायदेशीर लोन ॲप्सचे स्टेटमेंट आणि थकीत रकमेचा तपशील सोबत ठेवावा. बँकेच्या धोरणानुसार थकबाकीची रक्कम संबंधित संस्थांना थेट धनादेश (डीडी), एनईएफटी (NEFT) किंवा ग्राहकाच्या खात्यात जमा करून दिली जाऊ शकते.

  • जामीनदारांची तयारी: विनातारण कर्ज हवे असल्यास, नियमित उत्पन्न असलेले १ किंवा २ जामीनदार (पगारदार किंवा आयकर भरणारे) उपलब्ध असल्यास अर्जाची प्रक्रिया सुलभ होते.

अर्जापूर्वी तपासण्यायोग्य महत्त्वाच्या बाबी व कागदपत्रे

अर्ज करण्यापूर्वी नवीन कर्जाचा व्याजदर, प्रक्रिया शुल्क, मुदतपूर्व परतफेडीचे नियम आणि नवीन ईएमआय मासिक उत्पन्नात बसतो का, याची खात्री करावी. सोबतच पॅन कार्ड, आधार कार्ड, अलीकडील पगाराच्या पावत्या किंवा उत्पन्नाचा पुरावा, गेल्या ३ ते ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट, विद्यमान कर्जांचा तपशील आणि चांगला क्रेडिट स्कोअर (साधारणपणे ७०० किंवा त्याहून अधिक) तयार ठेवावा.

अधिकृत आणि नियमनबद्ध बँकिंग प्रणालीचा वापर करून, अटी-शर्ती स्पष्ट समजून घेऊन आणि योग्य आर्थिक नियोजन करून कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडणे अधिक सुरक्षित ठरते.

SCROLL FOR NEXT