क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरूनही CIBIL स्कोअर घसरतोय 
Arth Warta

क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरूनही CIBIL स्कोअर घसरतोय? कारण समजून घ्या!

फक्त वेळेवर पेमेंट पुरेसे नाही; ‘क्रेडिट युटिलायझेशन’ आणि स्टेटमेंट डेट तुमच्या स्कोअरवर करतात मोठा परिणाम

Prachi Tadakhe

अनेक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांचा असा समज असतो की, बिल वेळेवर भरले की आपला CIBIL स्कोअर नेहमी चांगलाच राहतो. मात्र, प्रत्यक्षात चित्र थोडे वेगळे आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमचा क्रेडिट स्कोअर फक्त वेळेवर पेमेंटवर अवलंबून नसून, तुम्ही कार्डची मर्यादा (लिमिट) किती प्रमाणात वापरता यावरही तो मोठ्या प्रमाणात ठरतो.

जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा वारंवार ८० ते ९० टक्के वापर करत असाल, तर बँकांच्या दृष्टीने तुम्ही कर्जावर अधिक अवलंबून आहात असे मानले जाते. उदाहरणार्थ, तुमच्या कार्डची मर्यादा १ लाख रुपये असेल आणि तुम्ही दर महिन्याला ४०-५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असाल, तर तुमचा ‘क्रेडिट युटिलायझेशन रेशो’ वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, हा रेशो ३० टक्क्यांच्या खाली ठेवणे सर्वात सुरक्षित मानले जाते. एकदा हा आकडा ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला की, त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर दिसू लागतो.

याशिवाय, बँका तुमच्या व्यवहारांची माहिती ठराविक ‘स्टेटमेंट डेट’ला क्रेडिट ब्युरोला पाठवतात. त्या दिवशी तुमचा वापर जास्त दिसत असेल, तर जरी तुम्ही नंतर वेळेवर बिल भरले तरीही ब्युरोच्या नोंदीत तुमचा वापर ‘जास्त’ म्हणूनच दिसतो. यामुळे तुमच्या आर्थिक शिस्तीबाबत नकारात्मक छाप पडू शकते.

काय करावे? (उपयुक्त मार्गदर्शन)

  • वापरावर नियंत्रण ठेवा: क्रेडिट कार्डचा वापर एकूण मर्यादेच्या ३०% च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • स्टेटमेंटपूर्वी पेमेंट करा: मोठा खर्च झाल्यास स्टेटमेंट तयार होण्यापूर्वी काही रक्कम भरून टाका.

  • क्रेडिट लिमिट वाढवा: बँकेकडे विनंती करून कार्डची मर्यादा वाढवून घ्या, त्यामुळे वापराचे टक्केवारी कमी दिसेल.

फक्त वेळेवर बिल भरणे पुरेसे नाही. योग्य नियोजन, मर्यादित वापर आणि आर्थिक शिस्त या गोष्टींचे पालन केल्यासच तुमचा CIBIL स्कोअर सुरक्षित आणि मजबूत राहू शकतो.

SCROLL FOR NEXT