(डावीकडून) प्रज्वल बिरे, देवदान गायकवाड, पूजा घाडगे, अभिजित मोरे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे आणि उपाध्यक्ष सी.ए. यशवंत कासार 
Arth Warta

कॉसमॉस बँकेचा 120 वर्षांचा प्रवास, दृष्टिहीनांना मिळाली नवी दिशा

ग्राहक सेवेची 120 वर्षे पूर्ण करत असलेल्या कॉसमॉस बँकेने सामाजिक जबाबदारी जपत चार दृष्टिहीन तरुणांना सेवेत सामावून घेऊन सहकारी बँकिंग क्षेत्रात इतिहास घडवला.

Prachi Tadakhe

पुणे | 30 जानेवारी 2026

ग्राहक सेवेची 120 वर्षे पूर्ण करत असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या सामाजिक बांधिलकीला ठोस स्वरूप देत एक अत्यंत प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. 18 जानेवारी 2026 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात बँकेने चार दृष्टिहीन तरुणांची नियुक्ती करत समावेशकतेचा आदर्श घालून दिला.

या नियुक्ती पत्रांचे वितरण बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सी.ए. दिलीप सातभाई उपस्थित होते. नियुक्त झालेल्या दृष्टिहीन तरुणांमध्ये देवदान गायकवाड, अभिजित मोरे, पूजा घाडगे आणि प्रज्वल बिरे यांचा समावेश आहे. त्यांची ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे.

पारदर्शक निवड प्रक्रिया

या उमेदवारांची निवड एमएस वर्ड, एक्सेल चाचणी तसेच मुलाखतीद्वारे करण्यात आली. त्यांना बॅक ऑफिस आणि मुख्य कार्यालयात त्यांच्या क्षमतेनुसार काम दिले जाणार असून, आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सॉफ्टवेअर सपोर्टही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिली ठोस पायरी

कॉसमॉस बँकेने हे पाऊल उचलून सहकारी बँकिंग क्षेत्रात एक महत्त्वाचा पायंडा घातला आहे. बँकेच्या 120 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दृष्टिहीन व्यक्तींना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. हा उपक्रम बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सी.ए. मिलिंद काळे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे.

मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश

या उपक्रमाबाबत माहिती देताना सी.ए. मिलिंद काळे म्हणाले की,

“दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देणे, हाच आमचा उद्देश आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम आम्ही राबवणार आहोत. सहकारी बँकिंग क्षेत्रात कॉसमॉस ही बहुधा पहिली बँक असेल, जिने दृष्टिहीन व्यक्तींना सेवेत सामावून घेतले आहे.”

कॉसमॉस बँकेचा हा उपक्रम केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून, तो समावेशक विकासाचा संदेश देणारा ठरतो. सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचा सुरेख संगम घडवत बँकेने पुन्हा एकदा आपली मूल्यनिष्ठ परंपरा अधोरेखित केली आहे.

SCROLL FOR NEXT