सहकार क्षेत्रात आदर्श कामगिरी; वीरशैव पतसंस्थेच्या व्यवसायात मोठी वाढ. 
Co-op Credit Societies

वीरशैव पतसंस्थेची आर्थिक यशाकडे वाटचाल; ४८ कोटी ८४ लाखांचा टप्पा पार

वीरशैव पतसंस्था, आटपाडी: विश्वासाची ३५ वर्षे, प्रगतीची नवी शिखरे!

Prachi Tadakhe

आटपाडी: (सांगली) सहकारी क्षेत्रातील आदर्श कार्याचा गौरव लाभलेल्या आटपाडी येथील वीरशैव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय ४८ कोटी ८४ लाख रुपयांवर पोहोचला असून, संस्थेने १ कोटी ४२ लाख रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन अजित भिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

३५ वर्षांची विश्वासाची परंपरा

आटपाडी शहरात गेल्या ३५ वर्षांपासून सहकारी चळवळीत सक्रिय असलेल्या या संस्थेवर नागरिकांचा विश्वास सातत्याने वाढत आहे. सध्या आटपाडी आणि दिघंची या भागात संस्थेचे जाळे पसरलेले असून, सभासदांच्या वाढत्या मागणीनुसार लवकरच झरे येथे नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहे. तसेच, संस्था लवकरच आपल्या स्वमालकीच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होणार असल्याचेही चेअरमन भिंगे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

भक्कम आर्थिक पाया

३१ मार्च अखेरच्या आर्थिक अहवालानुसार, संस्थेची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. संस्थेकडे सध्या २,८२७ सभासद असून, त्यांचे २ कोटी ३२ लाख रुपयांचे भागभांडवल जमा आहे. संस्थेचा स्वनिधी ३ कोटी ५५ लाख रुपये असून, एकूण ठेवी २४ कोटी २६ लाखांवर पोहोचल्या आहेत. कर्जवाटपाचा आकडा २२ कोटी ५७ लाख रुपये असून ६ कोटी ५६ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक संस्थेने केली आहे.

कार्यक्षम व्यवस्थापन आणि अत्यल्प थकबाकी

आजच्या स्पर्धात्मक युगातही वीरशैव पतसंस्थेने आपली थकबाकी केवळ ४.४८ टक्क्यांवर मर्यादित ठेवली आहे, तर नेट एनपीएचे प्रमाण २.६५ टक्के इतके कमी आहे. संस्थेच्या एकूण ६ कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली असून, प्रति सेवक ८ कोटी १४ लाख रुपयांचा व्यवसाय हे संस्थेच्या कार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. संस्थेचा निव्वळ नफा ७२ लाख ३८ हजार रुपये इतका झाला आहे.

तंत्रज्ञानाची जोड आणि भविष्यवेधी दृष्टी

"विना सहकार नाही उद्धार" हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या या संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. सभासदांच्या गरजा ओळखून त्यांना तत्पर सेवा देण्यावर व्यवस्थापनाचा भर आहे.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन शिल्पा हेकणे, सचिव वृषाली कुंभार, संचालक भारत जवळे, दिलीप लिगाडे, संगम डोवे, अमोल राजमाने, केदारनाथ भिंगे, राहुल घोंगडे, दत्तात्रय माने, शोभा डिगोळे, अनिल रुपटक्के आणि शाखाधिकारी इम्रान मुल्ला यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT