रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेने ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. संस्थेच्या आर्थिक शिस्तीमुळे आणि नियोजनबद्ध धोरणांमुळे सर्वच आर्थिक निर्देशांकात स्थिर वाढ दिसून आली आहे.
संस्थेच्या ठेवींनी तब्बल ४०८ कोटी ८८ लाख रुपयांचा टप्पा गाठला असून, कर्ज वितरणही ३०२ कोटी ६५ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यासोबतच १६९ कोटी २९ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, जी संस्थेच्या आर्थिक मजबुतीचे प्रतीक मानली जाते.
विशेष म्हणजे, संस्थेची वसुली दर ९९.८२ टक्के इतकी असून, नेट एनपीए शून्य टक्के राहणे ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. त्यामुळे संस्थेची कर्जवाटपातील शिस्त आणि जोखमीचे व्यवस्थापन प्रभावी असल्याचे स्पष्ट होते.
या आर्थिक वर्षात संस्थेला १० कोटी ९४ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, सीडी रेशो ६५.०१ टक्के इतका आहे. तसेच, संस्थेचा स्वनिधी ५४ कोटी ७३ लाख आणि खेळते भांडवल ४८८ कोटी ६३ लाख इतके नोंदवले गेले आहे.
संस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने पारदर्शकता, शिस्त आणि ग्राहकाभिमुख धोरणे यावर भर दिला असून, भविष्यातही हीच वाटचाल कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.