पारनेर (टाकळी ढोकेश्वर): श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेने सलग प्रगतीची परंपरा कायम राखत आर्थिक वर्षात ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. या घवघवीत यशाच्या जोरावर बँकेच्या सर्व सभासदांना १० टक्के लाभांश (Dividend) दिला जाणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष अॅड. अशोक शेळके यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे बँकेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
नफा व लाभांश: बँकेला या वर्षात साडेपाच कोटी ५३ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, निव्वळ नफा ४ कोटी ६५ लाख रुपये आहे.
ठेवी आणि कर्जे: ३१ मार्चअखेर बँकेकडे ३१६ कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून, १६६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
व्यवसाय व भांडवल: बँकेचे खेळते भांडवल ३७९ कोटी रुपये झाले असून, बँकेने एकूण ५०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ४८२ कोटी रुपये होता.
एनपीए (NPA) शून्य टक्के: बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे (Net NPA) प्रमाण ०.००% राहून वित्तीय शिस्त सिद्ध झाली आहे, तर ढोबळ एनपीए ०.८७% इतका अल्प आहे.
सुरक्षित गुंतवणूक: बँकेने १८८ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली असून, स्थापनेपासून बँकेला 'अ' वर्ग लेखापरीक्षण (Audit Class A) मिळाले आहे.
२९ व्या वार्षिक सभेदरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सहकार विकास अधिकारी वैजयंता मानकर यांनी उपस्थित सभासदांना सहकार विषयावर सखोल प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद झावरे यांनी केले, तर अॅड. सूर्यकांत काणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सर्वसाधारण सभेला बँकेचे संचालक भास्कर शेळके, अंबादास झावरे, अॅड. सूर्यकांत काणे, डॉ. उत्तम थोरात, रामदास आंधळे, तारकराम झावरे, राजाराम गुंड, सतीश परांडे, विनायक कारखिले, अॅड. बाबाजी सांगळे, भाऊसाहेब आहेर, बाळासाहेब सातव, व्यवस्थापन मंडळ सदस्य स्वप्नील गाडगे, नागेश वाळुंज यांसह बँकेचे कर्मचारी, ग्राहक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.