धाराशिव: श्रीसिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिवची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक आणि शहरातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. धाराशिवच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे या सभेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विश्वासाची १५ वर्षे आणि पारदर्शक आर्थिक वाटचालीचा गौरवशाली इतिहास असलेल्या या सभेत संस्थेने सभासदांसाठी १३ टक्के लाभांश जाहीर केल्यामुळे उपस्थित सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा, आर्थिक प्रगतीचा तसेच भविष्यातील वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ठेवी, कर्ज व्यवहार, एनपीए (थकबाकी) आणि आर्थिक बाबींवर सखोल चर्चा झाली. उपस्थित सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत सभेत मांडण्यात आलेल्या विविध ठरावांना सर्वानुमताने मंजुरी दिली. गेल्या १५ वर्षांच्या काळात संस्थेने ग्राहकांच्या विश्वासाला सदैव केंद्रस्थानी ठेवून सहकार क्षेत्रात आपली एक स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहकार क्षेत्राच्या व्यापक स्वरूपावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,
"सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी, रोजगारनिर्मिती, आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीचे एक भक्कम माध्यम बनले पाहिजे."
तसेच, सभासद आणि ग्राहकांच्या अतूट विश्वासाच्या बळावरच संस्था आज यशाच्या शिखरावर पोहोचली असून आगामी काळातही संस्थेच्या कार्याचा ठसा समाजमनावर उमटविला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन दिनेश कुलकर्णी यांनी सभेमध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा करताना, संस्थेत गुंतवलेल्या शेअर्सवर १३ टक्के लाभांश जाहीर केला. या घोषणेमुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. "सभासदांचा विश्वास, हीच श्री सिध्दीविनायकची खरी ताकद आहे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या शानदार सोहळ्यास दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मीनाताई कुलकर्णी, सी. प्रतिभा रामराव काळे, सौ. दिपाली कुलकर्णी, नितीन भोसले, मधुकर जाधव, बालाजी कोरे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वास कोकणे, प्रविण पाठक, राहुल काकडे, सुजित साळुंके, शिवाजी गिड्डे, दाजी आप्पा पवार, अभिजीत काकडे, प्रतिक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी, रामचंद्र सारडे, सौ. राधिका तानवडे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आगामी काळातही सभासदांचे आर्थिक हित, विश्वासार्ह सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांना सर्वोच्च प्राधान्य देत श्री सिध्दीविनायक परिवाराची वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असा दृढनिश्चय या वार्षिक सभेत व्यक्त करण्यात आला.