चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वसंत जिनिंग हॉल येथे उत्साहात पार पडली. सभेत संचालक सुरेश बरडे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी सभासदांच्या योगदानाचे कौतुक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी आर्थिक अहवाल सादर केला.
आर्थिक वर्षांत ( २०२४-२५) संस्थेला २.९७ कोटी नफा झाला असून, सभासदांना ३ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ठेवींचे प्रमाण ८७३.३२ कोटी असून संस्था २१ शाखांद्वारे ९१,३५५ सभासदांना सेवा पुरवत आहे. संस्थेची स्थापना १९८९ मध्ये स्व. भैयाजी पामपट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. २००२ पासून अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायल परांडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक चिंतामण आगलावे यांनी आभार मानले.