श्रीरामपूर: सहकारी क्षेत्रात आपल्या शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था, श्रीरामपूर यांनी ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर करण्याची आपली परंपरा यंदाही कायम राखली आहे. संस्थेने सर्वच आर्थिक निकषांवर उंचावता आलेख कायम राखत सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
संस्थेच्या प्रगतीचा आलेख खालील आकडेवारीवरून स्पष्ट होतो:
ठेवी: ५७ कोटी ३४ लाख ७० हजार २६५ रुपये.
कर्ज वाटप: ४१ कोटी ४६ लाख १९ हजार ९९४ रुपये.
गुंतवणूक: २१ कोटी १६ लाख २६ हजार ०६९ रुपये (१९ विविध सक्षम बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक).
निव्वळ नफा: ९७ लाख २३ हजार ९१० रुपये.
निधी: ४ कोटी ६ लाख २२ हजार ६११ रुपये.
भागभांडवल: १ कोटी ७ लाख ८८ हजार ६३८ रुपये.
सी.डी. रेशो: ६०.८६%
संस्थेची वसुली टीम वर्षभर कार्यरत असल्यामुळे आणि वसुलीच्या नाविन्यपूर्ण योजना राबविल्यामुळे थकबाकीचे प्रमाण अत्यंत अल्प राहिले आहे. जिथे गरज आहे तिथे कायदेशीर प्रक्रिया राबवून संस्था वसुलीवर कडक नियंत्रण ठेवून आहे.
संस्थेने ४१ कोटींहून अधिक कर्ज वितरण करताना सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने सोने तारण कर्ज, लहान कर्जे आणि उत्पादक व्यवसायासाठी कर्ज देताना 'सुरक्षित व अभ्यासपूर्ण कर्ज वितरण' हा निकष पाळला आहे. तसेच, ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी १९ विविध बँकांमध्ये २१ कोटींहून अधिक रक्कम गुंतवून त्यातून उत्पन्न वाढीवर भर दिला आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. वासुदेव काळे आणि उपाध्यक्ष श्री. सुनील बोलके यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने 'संस्था हित प्रथम' हे तत्व पाळले आहे. यावेळी बोलताना संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, "कठोर निर्णय आणि शिस्तबद्ध व्यावसायिक व्यवस्थापन यामुळेच आज आपण ९७ लाखांच्या नफ्याचा टप्पा ओलांडू शकलो आहोत. संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी आणि संचालक मंडळाची निष्ठा हेच या यशाचे मुख्य सूत्र आहे."
'लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडा'अंतर्गत संस्थेतील ९९% ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षित आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करून ठेवीदारांना योग्य परतावा देण्याचे धोरण संस्थेने राबविले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.