आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात सहकार क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणे आव्हानात्मक असते. मात्र, श्री वीरभद्र अर्बन मल्टिस्टेट सोसायटीने ग्राहकाभिमुख सेवा आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. केवळ दोन वर्षांत संस्थेने आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून संस्थेने विविध प्रकारच्या सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे अनेक व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. उत्तम ग्राहक सेवा हेच या प्रगतीचे मुख्य गमक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यालयात व शाखांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे व हितचिंतकांचे संस्थेच्या वतीने आपुलकीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संतोष जंगम, उपाध्यक्ष कुमार हिरेमठ, संचालिका नूतन जंगम व मनीषा आंबुपे, संचालक राहुल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत पुढील वाटचालीचे नियोजन शब्दबद्ध केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कुंभार, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश्वरी भोसले, अजित उपाध्ये, शाखा व्यवस्थापक सुनील पाटील, संग्राम देशमुख, वरिष्ठ अधिकारी अभिजित यादव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून ग्राहकांचे स्वागत केले.
"ग्राहकांचा वाढता विश्वास आणि कर्मचाऱ्यांची सातत्यपूर्ण सेवा यामुळेच संस्था आज प्रगतीपथावर आहे," अशी भावना व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाची जोड देत अधिक गतीने आणि पारदर्शकतेने सेवा देण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रातून वीरभद्र मल्टिस्टेट सोसायटीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.