कोपरगाव येथील पद्मविभूषण डॉ. शरद पवार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात माजी आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे होते.
यावेळी संस्थेचा गौरव करताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, सहकारी संस्था सक्षम आणि यशस्वी व्हायच्या असतील तर त्या काटकसरीने, पारदर्शकतेने व शिस्तबद्ध पद्धतीने चालवाव्या लागतात; तरच सभासदांचा आणि ठेवीदारांचा संस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत होतो. पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेने कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांना दृष्टीआड न होवू देता पारदर्शकता आणि विश्वासार्हतेच्या मूल्यांवर आधारित सेवा पुरवून सभासद, ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, सहकारी संस्था म्हणजे केवळ व्यवस्थापन नव्हे, तर विश्वासाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे एक जिवंत रूप आहे. सभासदांचा पैसा ही एक मोठी जबाबदारी आहे. तो खर्च करताना प्रत्येक संस्थेने अनावश्यक खर्च टाळल्यासच संस्थेचा आर्थिक पाया भक्कम राहतो. पतसंस्थेची वाटचाल अत्यंत उल्लेखनीय असून, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही संस्था मोलाचे कार्य करत आहे. संस्थेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज संस्थेकडे ४७ कोटींच्या ठेवी आहेत.
अहवाल वर्षात संस्थेने २८ कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेच्या कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांच्याकडे आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.३४ टक्के आहे. एनपीएच्या व्याज व मुद्दलासाठी ८ कोटी ४५ लाख ९९ हजारांची गुंतवणूक केली असून १०० टक्के तरतुदीमुळे निव्वळ एनपीए ० टक्के आहे. लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडिट वर्ग 'अ' मिळाला असून १ कोटी १ लाख २४ हजार रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे पतसंस्था आर्थिक प्रगतीच्या दिशेने भक्कमपणे मार्गक्रमण करीत आहे. त्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे आ.आशुतोष काळे यांनी कौतुक केले आणि सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले.
अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी केले. याप्रसंगी काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीप बोरनारे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, सुभाष आभाळे, प्रशांत घुले, मनोज जगझाप, श्रीराम राजेभोसले, श्रावण आसने, डॉ. मच्छिंद्र बर्डे, छबुराव आव्हाड, विश्वास आहेर, गोरक्षनाथ जामदार, विजय कुलकर्णी, बाबासाहेब कोते, अर्जुन काळे, चारुदत्त सिनगर, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, व्हा. चेअरमन सुनील डोंगरे, प्रवीण पावडे, बापूसाहेब घेमुड, सोमनाथ बोरनारे, सुनील कोल्हे, बाबा सय्यद, मंगेश देशमुख, सुरेश पेटकर, दौलतराव मोरे आदी उपस्थित होते.