५८० कोटींच्या व्यवसायासह 'सांगली सॅलरी अर्नर्स'ची पश्चिम महाराष्ट्रात अव्वल भरारी 
Co-op Credit Societies

दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसा.ची आर्थिक घोडदौड: सभासदांना ९% लाभांश

२६ जुलैला रंगणार ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

Prachi Tadakhe

सांगली: पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या 'दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसा. लि., सांगली' या संस्थेने चालू आर्थिक वर्षात १०.१२ कोटी रुपयांचा उच्चांकी नफा कमावला आहे. संस्थेची ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता भावे नाट्यमंदिर, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेपूर्वी सकाळी १०:०० वाजता सभासदांसाठी विशेष 'सहकारी प्रशिक्षण' आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन झाकीरहुसेन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला संस्थेचे व्हाईस चेअरमन मिलिंद हारगे यांच्यासह सर्व संचालक, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सभासद उपस्थित होते.

  1. ९% लाभांश वाटपाचा मानस: नफ्यातून सभासदांना ९% लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. यानुसार ८ कोटी ३४ लाख २८ हजार रुपये लाभांश आणि कायम ठेवीवर डिव्हिडंड दराने १५ लाख ४५ हजार रुपये व्याज सभासदांना दिले जाणार आहे.

  2. कमी व्याजदराचा फायदा: सभासदांचे हित लक्षात घेऊन कर्जाचा व्याजदर १०% करण्यात आला आहे. तसेच सेवानिवृत्त ठेवीदारांच्या हितासाठी ठेवींवरील व्याजदर ८.२५% ठेवण्यात आला आहे.

  3. व्यवसायाचा ५८० कोटींचा टप्पा पार:

    • भागभांडवल: रु. ९९.१५ कोटी (पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक)

    • ठेवी: रु. २५६ कोटी

    • कर्ज: रु. ३२३.२७ कोटी

    • गुंतवणूक: रु. ८८ कोटी

    • एकूण सभासद संख्या: ९,४२७ (अहवाल सालात ७८३ नवीन सभासदांची नोंद)

सन २०१६-१७ पासून सुरू असलेल्या या अभिनव योजनेद्वारे अत्यंत अल्प हप्त्याच्या बदल्यात मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज निरंक केले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १९३ मयत सभासदांचे १४ कोटी ७५ लाख ७८ हजार ९१६ रुपयांचे कर्ज माफ करून त्यांच्या कुटुंबाला आणि जामीनदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या योजनेचे यश पाहून इतर जिल्ह्यातील संस्थांनीही हा पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली आहे.

सभासदांच्या सोयीसाठी पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, सातारा आणि गडहिंग्लज येथे विस्तारित कक्ष सुरू करण्यात आले आहेत. संस्थेने कोअर बँकिंग प्रणाली स्वीकारून सर्व शाखा ऑनलाइन केल्या आहेत, तसेच RTGS/NEFT ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने व्यवहारात गतिमानता आली आहे.

"संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून संस्थेला सातत्याने 'अ' ऑडीट वर्ग मिळाला आहे. संचालक मंडळ नेहमीच सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करत राहील." - झाकीरहुसेन चौगुले (चेअरमन, सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटी .)
SCROLL FOR NEXT