वार्षिक सभेत अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी मांडला प्रगतीचा आलेख; रौप्य महोत्सवी वर्षात स्वतःची नवी वास्तू उभारणार. 
Co-op Credit Societies

चिपळूणच्या श्री समर्थ भंडारी नागरी सह. पतसंस्थेकडून १४% लाभांश जाहीर

२४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी मांडला प्रगतीचा आलेख; रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत संपूर्ण राज्यात विस्तार करण्याचा संकल्प

Prachi Tadakhe

चिपळूण: कोकणातील अग्रगण्य आणि अत्यंत विश्वासार्ह आर्थिक संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेल्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली. चिपळूण येथील स्वा. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष माननीय प्रभाकरजी आरेकर होते. या सभेमध्ये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या नेत्रदीपक कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा अहवालाद्वारे सभासदांसमोर मांडण्यात आला आणि संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीची माहिती सादर करण्यात आली.

विशेष म्हणजे, संस्थेने यंदा आपल्या रौप्य महोत्सवी (२५ व्या) वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून ते संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्याचा, तसेच संस्थेची नवीन स्वतंत्र वास्तू (मुख्यालय) उभारण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी सभासदांसमोर जाहीर केला. त्यांच्या या घोषणेला उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

संस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षअखेर आर्थिक निकषांवर अत्यंत मजबूत कामगिरी नोंदवली आहे. वर्षअखेर संस्थेचे एकूण भागभांडवल १३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संस्थेवरील ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे स्पष्ट करत एकूण ठेवी २७५ कोटी २२ लाख रुपयांवर गेल्या आहेत, तर एकूण कर्ज व्यवहार २२९ कोटी ३६ लाख रुपयांचा झाला आहे.

संस्थेचा एकूण निधी २३ कोटी १७ लाख रुपये असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून विविध ठिकाणी १०८ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या सर्व कामगिरीच्या जोरावर संस्थेचा एकत्रित व्यवसाय (Total Business) ५०४ कोटी ५८ लाख रुपयांवर पोहोचला असून, खेळते भांडवल ३४८ कोटी ७३ लाख रुपये इतके झाले आहे.

आर्थिक शिस्तीचे पालन केल्यामुळे संस्थेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २० कोटी १२ लाख रुपयांचा एकूण नफा झाला असून, नियमानुसार सर्व आवश्यक तरतुदी केल्यानंतर ८ कोटी ९० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या या पारदर्शक कारभारामुळे तिला 'ऑडिट वर्ग अ' प्राप्त झाला असून, सभासदांसाठी १४ टक्के इतका घसघशीत लाभांश जाहीर करण्यात आला आहे.

गुणवंत पाल्यांसह आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव.

या वार्षिक सभेचे औचित्य साधून संस्थेच्या सभासदांच्या १० वी, १२ वी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष पुरस्कार प्राप्त मान्यवरांचाही संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ. राहुल विश्वनाथ दंडगे, चिपळूणचे नगरसेवक मिथिलेश नरळकर, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक सुनिल खेडेकर, मराठा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताराम सुर्वे, वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉ. राजरत्न राष्ट्रपाल सावंत आणि सीए परीक्षेत उत्तम यश मिळवलेली कु. तन्वी संतोष खातू या गुणवंतांचा समावेश होता.

यासोबतच संस्थेच्या दैनंदिन कामकाजात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 'आदर्श कर्मचारी पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आले. यामध्ये अनिकेत अनंत दामुष्ठे, अजिंक्य उदय तवसाळकर आणि सुचित सुरेंद्र चव्हाण या कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी संस्थेच्या मजबूत सांपत्तिक स्थितीचे विवेचन केले. ते म्हणाले की,

संस्थेच्या या यशामागे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊनच संस्थेचे कामकाज यापुढेही केले जाईल. संस्थेचा शाखा विस्तार करून तिला अधिक सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असून, त्यासाठी सर्वांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोकणचा विश्वास आता महाराष्ट्रभर! ‘ गुणवंत पाल्यांसह आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव.

उपस्थित सभासदांनी संस्थेच्या प्रगतीचे तोंडभरून कौतुक केले. कोकणातील एक अत्यंत विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख पतसंस्था म्हणून संस्थेने जो नावलौकिक मिळवला आहे, त्याबद्दल त्यांनी संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर आरेकर, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे मनापासून अभिनंदन केले.

SCROLL FOR NEXT