धाराशिव: येथील प्रभात सहकारी पतपेढीची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुष्पक मंगल कार्यालयात सभासदांच्या प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेने सभासदांसाठी १२ टक्के लाभांश जाहीर केला असून, नियोजनबद्ध वसुलीमुळे शून्य टक्के निव्वळ एनपीए (NPA) आणि ‘अ’ ऑडीट वर्ग मिळवून सहकार क्षेत्रात आपला आदर्श पॅटर्न पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी पतपेढीचे चेअरमन ॲड. महादेव यादव होते.
सभेत बोलताना अध्यक्ष ॲड. महादेव यादव यांनी सांगितले की, यंदा संस्थेला ९० लाख ५५ हजार ३५५ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
कार्यात्मक प्रगतीची माहिती देताना कार्यकारी संचालक एस. आर. नाईकवाडी यांनी पीपीटीद्वारे आकडेवारी सादर केली. मार्च २०२६ अखेर:
एकूण ठेवी: २८.६०% वाढीसह ५० कोटी ४७ लाख ४० हजार ३६७ रुपये
स्वनिधी: ९ कोटी १४ लाख ३३ हजार ५५९ रुपये
कर्ज वाटप: उद्योजक, शेतकरी, नोकरदार व व्यावसायिकांना ३१ कोटी ५४ लाख रुपये
तसेच, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पतपेढीकडून कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
या वार्षिक सभेत सामाजिक जाणीव जपत, आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त अनाथ मयतांवर अंत्यसंस्कार करणारे समाजसेवक बाळासाहेब गोरे यांचा स्मृतीचिन्ह व शिवचरित्र देऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
यासोबतच शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उज्ज्वल यश संपादन केलेल्या सभासदांच्या ३० गुणवंत पाल्यांचा सन्मानचिन्ह व शिवचरित्र देऊन गौरव करण्यात आला.
सभेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील, सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक डॉ. हर्षल डंबळ, उपाध्यक्ष प्रा. अनिल पाटील, विशेष लेखा परीक्षक श्री भोसले, उद्योजक सिंदफळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या कार्याचा गौरव करत ही संस्था सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून ओळख निर्माण करत असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष ॲड.यादव यांनी अहवाल वाचन केले तर श्री हनुमंत खोसे यांनी विषय पत्रिका सभासदांसमोर मांडली. ज्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.
तसेच शैक्षणिक व इतर क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या सभासदांच्या ३० पाल्यांचा सन्मानचिन्ह, शिवचरित्र देऊन सन्मान करण्यात आला. सुरूवातीस सहकार विभागाचे श्री जाधव यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. त्यानंतर संचालक डॉ. मोरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सेवानिवृत्त लेखापरीक्षक श्री सोनवणे, प्रभात सहकारी पतपेढीचे संचालक डॉ.डी.बी.मोरे, पंडित इंगळे, प्रविण पवार, उमेश मराठे, प्रा.अर्जुन यादव, बाबासाहेब माने, प्रा.दीपक पुजारी, अश्विनी नाईकवाडी, सुरेखा लोंढे, महादेव खटावकर,डॉ.अनघा तोडकरी, तज्ज्ञ संचालक कुबेर शिंदे, बाबासाहेब गरड, प्रभात मल्टीस्टेटचे संचालक प्रा.व्ही.एम.पाटील, डी.टी.पाटील, सी.पी.नाईकवाडी, डी.जी.पालके, ए.व्ही. ग़ायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सभेचे सुत्रसंचालन संचालक प्रा.पुजारी यांनी तर आभार प्रविण पवार यांनी मानले. सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.