अहिल्यानगर येथील "नागेबाबा" परिवाराने नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात पुढे करण्याची आपली परंपरा यंदाही जपली आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टीमुळे विशेषत: शेतकरी, दुकानदार आणि गोरगरीब नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अन्नधान्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेकडो हेक्टर पिके वाहून गेली, अनेक मुकी जनावरे मृत्युमुखी पडली आणि अनेकांच्या घरांत पाणी शिरून घर संसार, किराणा, किंमती वस्तू वाहून गेल्या आहेत.
आणि म्हणूनच या कोसळलेल्या संकटात त्यांना मदतीची नितांत गरज आहे, हे ओळखून आपली सामाजिक बांधिलकी जपत नागेबाबा मल्टीस्टेट, नागेबाबा पतसंस्था, या दोन्ही संस्थांतील कर्मचारी वृंद व नागेबाबा परिवारातील इतर सहकारी या सर्वांच्या सहकार्यातून, तसेच मुख्यमंत्री महोदय यांच्या विनंतीला मान देऊन, नुकताच नागेबाबा परिवाराच्या वतीने रु. ४,२५,००० (चार लाख पंचवीस हजार रुपये)चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी हा धनादेश अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक श्रीमान मंगेशजी सुरवसे साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.याप्रसंगी सहाय्यक निबंधक वाघमारे मॅडम तसेच गौतम देवळालीकर साहेब आणि व्यवहारे साहेब जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 तसेच सोबत नागेबाबा परिवारातील सदस्य उपस्थित होते.