जिल्हा उपनिबंधक संतोष सुरवसे ,मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक कडूभाऊ काळे, शिवाजी कपाळे व रवी कानडे  
Co-op Credit Societies

मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पतसंस्थांनी लोकांचा छातीठोक विश्वास मिळवावा : उपनिबंधक श्री. सुरवसे

Pratap Patil

अहिल्यानगर "मल्टीस्टेट पतसंस्थांचे थकीत कर्जाच्या वसुलीचे काम वैध ठरण्यासाठी कायदेशीररित्या होणे गरजेचे आहे. सहकारातून समृद्धीकडे हे पतसंस्थांचे ब्रीद आहे. त्यानुसार तळागाळातील जनसामन्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्थांनी काम करावे. यासाठी आपल्या व्याजदरावर अंकुश ठेऊन एकमेकांशी स्पर्धा न करता ठेवींवर व कर्जावर योग्य व्याजदर ठेवावेत. परतफेड करण्यास सक्षम व्यक्तींना कर्ज वाटप केल्यास संस्था अडचणीत येणार नाही. पतसंस्थेवर लोकांनी छाती ठोकून विश्वास ठेवावा, असे उत्कृष्ट काम करावे. मल्टीस्टेट पतसंस्थांच्या उत्तम कारभारासाठी फेडरेशन चांगले काम करत जागृती करत आहे," असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक संतोष सुरवसे यांनी केले.

मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मल्टीस्टेट पतसंस्थांच्या विक्री व वसुली अधिकाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक संतोष सुरवसे यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुरी तालुक्याचे साहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक कडूभाऊ काळे, शिवाजी कपाळे व रवी कानडे आदींसह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मल्टीस्टेट पतसंस्थांचे ३०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या शिबिरात प्रशिक्षक नवनाथ बिराजदार यांनी पतसंस्थांच्या विक्री व वसुली अधिकाऱ्यांना कायदेशीर कर्ज वसुलीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रस्ताविकात सुरेश वाबळे म्हणाले, "देशात सर्वात जास्त मल्टीस्टेट पतसंस्था महाराष्ट्रात आहेत. मल्टीस्टेट पतसंस्थांचा कारभार सुरळीत व नियमानुसार व्हावा यासाठी फेडरेशन प्रयत्नशील आहे. मात्र, काही पतसंस्थांच्या चुकीच्या कारभारामुळे ही चळवळ बदनाम झाली. पण ज्या पतसंस्था मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनच्या सभासद आहेत त्या सर्व पतसंस्था उत्कृष्ट काम करत आहेत. आता केंद्र सरकारच्या सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे मल्टीस्टेट पतसंस्थांना बँकांप्रमाणे काम करावे लागणार आहे. केंद्रीय सहकार खात्याचे काही नियम हे अन्यायकारक आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी मी दिल्लीत मंत्रालयात जाऊन सचिवांपुढे बाजू मांडली. त्यामुळे आता या नियमांमध्ये बदल झाले आहेत. मल्टीस्टेट पतसंस्थांच्या विकासासाठी व सर्व अधिकाऱ्यांना सक्षम व प्रशिक्षित करण्यासाठी मल्टीस्टेट पतसंस्था वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत आहे. या शिबिराच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न सोडवले जात आहेत."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दारुंटे यांनी केले, फेडरेशनचे संचालक शिवाजी कपाळे यांनी आभार मानले. फेडरेशनचे सचिव अनिल वर्पे व नागेबाबा संस्थेचे सीईओ अनिल कदम यांनी शिबिराचे नियोजन केले.

SCROLL FOR NEXT