गडहिंग्लज : मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही गगनभरारी घेऊ शकतात, हे मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील माने भगिनींनी सिद्ध करून दाखवले आहे. सानिका माने हिची 'भारतीय हॉकी सबज्युनिअर' संघात आणि भूमिका माने हिची 'महाराष्ट्र पोलिस दलात' निवड झाल्याबद्दल श्री रवळनाथ संस्था समूहाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स (मल्टिस्टेट) आणि श्री महालक्ष्मी वूमेन्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या गडहिंग्लज येथील प्रधान कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी रवळनाथ संस्था समूहाचे संस्थापक एम. एल. चौगुले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात एम. एल. चौगुले यांनी मुगळीसारख्या ग्रामीण भागातून येऊन या दोन्ही भगिनींनी मिळवलेले यश संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील झेप आणि शासकीय सेवेतील प्रवेश हा इतर तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवळनाथचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी केले. त्यांनी संस्था समूहाच्या सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीचा पुनरुच्चार करत गुणवंता पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. एम. एन. चौगुले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून दोन्ही भगिनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सानिका माने : भारतीय हॉकी सबज्युनिअर संघात निवड झाल्याबद्दल सानिका हिचा सत्कार मीना रिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला.
भूमिका माने : महाराष्ट्र पोलिस दलात भरती होऊन सेवेची संधी मिळवल्याबद्दल भूमिका हिचा सत्कार अलका आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यात श्री रवळनाथचे उपाध्यक्ष डॉ. संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री महालक्ष्मी वूमेन्स सोसायटीच्या अध्यक्षा प्राची मायदेव यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. गौरी बेळगुद्री यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले, तर कल्पना पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी रवळनाथ समूहाचे सीईओ डी. के. मायदेव यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, सभासद आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.