ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर; डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 
Co-op Credit Societies

रत्नागिरीत राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा व अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

पोटनियमात महत्त्वपूर्ण बदल, दरमहा १० युवकांना जोडण्याचे अध्यक्षांचे आवाहन आणि २ महिन्यांत 'आदर्श नमुने पुस्तिका' प्रकाशित करण्याची घोषणा.

Prachi Tadakhe

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अभ्यासवर्ग १ सप्टेंबर व २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे अत्यंत उत्साही आणि सहकारमय वातावरणात पार पडला. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या दोन दिवसीय महामेळाव्यात पतसंस्थांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील संस्था प्रतिनिधींनी या सभेला मोठी उपस्थिती दर्शवली होती.

  1. पोटनियमात सुधारणा: फेडरेशनच्या पोटनियमात महत्त्वाचे बदल करण्यास सभेने मंजुरी दिली. यानुसार फेडरेशनचे वर्गीकरण "अन्य संस्था" या प्रकारात करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

  2. ठेव संरक्षणासाठी शासकीय योगदानाची मागणी: सहकारी पतसंस्थांमधील सभासदांच्या ठेवींना भक्कम संरक्षण मिळावे यासाठी शासनाने भरीव योगदान द्यावे आणि याकरिता योग्य व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी. ही यंत्रणा पूर्णपणे लागू होईपर्यंत पतसंस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वपूर्ण ठराव या वेळी संमत करण्यात आला.

  3. केंद्रीय कायदे व रिझर्व्ह बँक (RBI): पतसंस्थांना 'क्रेडिट इन्स्टिट्यूशन' म्हणून मान्यता देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केंद्रीय कायद्यातील तरतुदींचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली.

  4. श्रेणीनिहाय वर्गवारी व पूरक धोरण: पतसंस्थांचे वाढते व्यवहार लक्षात घेता त्यांची श्रेणी ठरवून योग्य वर्गवारी करण्यात यावी आणि त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी पूरक धोरण आखावे, यासाठी फेडरेशनतर्फे पाठपुरावा करण्याचा ठराव पारित झाला.

सहकार क्षेत्राची प्रतिमा अधिक विश्वासार्ह व शिस्तप्रिय बनवण्याचा निर्धार; राज्यभरातून प्रतिनिधींची मोठी उपस्थिती.

अध्यक्षीय भाषणात ॲड. दीपक पटवर्धन यांनी संस्थांनी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह व शिस्तप्रिय ठेवण्याचे आवाहन केले. तरुण पिढीला सहकार क्षेत्राशी जोडण्यावर भर देताना त्यांनी सांगितेल की, सर्व पतसंस्थांनी दरमहा किमान १० नवीन युवकांना संस्थेशी संलग्न करण्याचा उपक्रम प्राधान्याने राबवावा.

तसेच, पतसंस्थांमधील व्यवहारांचे कायदेशीर साचेबद्धीकरण (Documentation) करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी अर्ज, करार, रोखे यांसारख्या कागदपत्रांची 'आदर्श नमुने पुस्तिका' येत्या दोन महिन्यांत प्रकाशित केली जाईल, अशी घोषणाही पटवर्धन यांनी केली. पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वंकष अभ्यासक्रमही तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक श्री. राम कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय अभ्यासवर्मात जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अभय माटे, डॉ. सोपान शिंदे आणि श्री. सुहास पाटणकर यांनी प्रतिनिधींना मोलाचे मार्गदर्शन केले. विशेषतः श्री. अभय माटे यांनी 'DPDP कायदा आणि डेटा संरक्षण' या आधुनिक व अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पतसंस्था प्रतिनिधींसाठी पहिलेच मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. याशिवाय, विविध तंत्रज्ञान प्रायोजकांनी आपले सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप्स आणि विमा योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

या महामेळाव्याला फेडरेशनचे सरचिटणीस राजोबा सर, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले, श्री. छाबडा, प्रा. श्री आकरे, श्री. वाजे, श्री. तांबेकर, श्री. बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे, कोकण विभागीय फेडरेशनचे संतोष थेराडे, सिंधुदुर्ग पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. राऊळ, रत्नागिरी डीसीसी बँकेचे संचालक श्री. सचिन भिंगारडे, शिवकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी संस्थेचे अध्यक्ष मांडवकर, नागपूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरीव सहकार्याने आणि उत्कृष्ट नियोजनामुळे ऐन श्रावण मासात पार पडलेला हा सहकार महामेळ संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी अत्यंत लक्षणीय व यशस्वी ठरला आहे.

SCROLL FOR NEXT