पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विनायकराव देशमुख यांची संस्थेला सदिच्छा भेट 
Co-op Credit Societies

सचोटीच्या कारभारामुळे कान्हूर पठार पतसंस्थेने जिंकला विश्वास!

अध्यक्षा सुशीलाताई ठुबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची दमदार वाटचाल; १७ शाखांद्वारे ग्राहकांची सेवा.

Prachi Tadakhe

अहिल्यानगर: "सहकार क्षेत्रातील वाढती आव्हाने आणि संवेदनशील काळात आर्थिक शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. स्व. दिलीपराव ठुबे यांनी घालून दिलेल्या याच आदर्श आर्थिक शिस्तीचे आणि पारदर्शकतेचे पालन कान्हूर पठार पतसंस्था सातत्याने करत आहे. केवळ आणि केवळ सचोटीच्या कारभारामुळेच या संस्थेने सभासद आणि ठेवीदारांचा अढळ विश्वास संपादन केला असून, आजच्या काळात सहकार चळवळीत संस्थेने आपले एक वेगळे व मानाचे स्थान निर्माण केले आहे," असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक श्री. विनायकराव देशमुख यांनी केले.

राज्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कान्हूरपठार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान श्री. देशमुख यांनी कान्हूर पठार पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

  • यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुशीलाताई दिलीपराव ठुबे, कार्यकारी संचालिका नमिताताई दिलीपराव ठुबे, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. विश्वनाथ दादा कोरडे, संचालक श्री. भास्कर ठुबे आणि श्री. सुहास शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक स्व. दिलीपराव ठुबे यांच्या स्मृतींना उजाळा देताना श्री. विनायकराव देशमुख पुढे म्हणाले की,

"स्व. दिलीपराव यांनी संस्थेचा कारभार चालवताना 'आर्थिक शिस्तीचे कठोर पालन' आणि 'राजकारणापासून अलिप्तता' हे दुहेरी धोरण स्वीकारले होते. हाच दूरदर्शी दृष्टिकोन संस्थेच्या भक्कम पायाभरणीसाठी मैलाचा दगड ठरला. राजकारणाचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होऊ न देता, केवळ सभासद आणि ठेवीदारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच या संस्थेने सहकार क्षेत्रात आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे."

अध्यक्षा श्रीमती सुशीलाताई ठुबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेची सुरू असलेली घोडदौड कौतुकास्पद असून, भविष्यात संस्थेच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमाला आणि कामाला आपले संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी या प्रसंगी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या कार्यकारी संचालिका नमिताताई ठुबे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. माहिती देताना त्या म्हणाल्या की,

संस्थेचे जाळे अत्यंत वेगाने आणि विश्वासाने विस्तारत असून, सध्या संस्थेच्या १७ यशस्वी शाखा कार्यरत आहेत. ग्राहकांच्या विश्वासामुळे संस्थेकडे आज ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी जमा आहेत. संस्थेमध्ये जवळपास १०० हून अधिक कर्मचारी अहोरात्र सेवा देत असून, संचालक मंडळाच्या एकमताने आणि पारदर्शकतेने सर्व धोरणात्मक निर्णय घेतले जातात. यामुळेच संस्थेची पत उत्तरोत्तर वाढत आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कान्हूर पठार पतसंस्थेच्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने भाजप जिल्हा समन्वयक श्री. विनायकराव देशमुख आणि ज्येष्ठ नेते श्री. विश्वनाथ दादा कोरडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, सध्याच्या कठीण परिस्थितीतही 'कान्हूर पठार' पतसंस्थेने जपलेली विश्वासार्हता इतर सहकारी संस्थांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा सूर या भेटीदरम्यान उमटला.

SCROLL FOR NEXT