पेठवडगाव येथील जयभवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलास सणगर होते. सभेत मनोगत व्यक्त करताना माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले की, "कोणत्याही संस्थेची प्रगती ही केवळ भांडवलावर अवलंबून नसून प्रशिक्षित कर्मचारी, त्यांचे आदर्श विचार व वर्तन यावर ठरत असते. येथील जयभवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत सध्या तीनशे कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. सर्वानी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमाची ही पोचपावती आहे."
यावेळी माजी नगराध्यक्षा विद्या पोळ, ज्येष्ठ संचालक सुनील हुकेरी, माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव, उपाध्यक्ष शेलार पोळ, रणजितसिंह यादव, विशाल वडगावे, शरद पाटील उपस्थित होते. विषय वाचन सरव्यवस्थापक राजकुमार पोळ यांनी केले, सुनील हुकेरी, सुधाकर पिसे यांनी मनोगत केले. सभेस सर्व संचालक, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.