महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नवीन लेखापरीक्षक नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक व पात्र लेखापरीक्षकांकडून 6 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 दरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही माहिती सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय, पुणे यांनी जारी केलेल्या परिपत्रकातून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 81 आणि नियम 69 अंतर्गत सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी नामतालिका तयार करणे आवश्यक आहे. यापूर्वीची नामतालिका 31 मार्च 2026 रोजी संपुष्टात येत असल्याने नवीन दोन वर्षांसाठी (1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2028) ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या नामतालिकेत सनदी लेखापाल, परिव्यय लेखापाल, प्रमाणित लेखापरीक्षक तसेच शासकीय लेखापरीक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यमान नामतालिकेतील लेखापरीक्षकांनाही नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहणार असून, नव्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध आहे
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर पार पडणार असून, अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, लेखापरीक्षणाचा अनुभव, पॅन कार्ड, फोटो व स्वयंघोषित शपथपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहणार आहे.
अर्जांची छाननी जिल्हा स्तरावर 21 एप्रिल ते 5 मे दरम्यान करण्यात येईल, त्यानंतर सहकार आयुक्त कार्यालय स्तरावर पुढील तपासणी होणार आहे. अपात्र अर्जदारांसाठी तक्रार निवारण यंत्रणाही उपलब्ध ठेवण्यात आली असून अंतिम पात्र यादी 10 जून 2026 पर्यंत जाहीर केली जाणार आहे.
लेखापरीक्षकांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा वर्गांमध्ये वर्गवारी करण्यात येणार असून, त्यासाठी अनुभव, पात्रता आणि नियमांनुसार निकष निश्चित करण्यात आले आहेत. विशेषतः मराठी भाषेचे ज्ञान, सहकारी संस्थांचे ज्ञान आणि संबंधित अनुभव अनिवार्य ठेवण्यात आला आहे.
सहकार विभागाने सर्व संबंधित कार्यालयांना ही प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.