‘दीपस्तंभ २०२५’ राज्यस्तरीय पुरस्कार 
Co-op Credit Societies

कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेला ‘दीपस्तंभ २०२५’ राज्यस्तरीय पुरस्कार

सहकारातील दिशादर्शक कामगिरी - विश्वास, शिस्त आणि यशाची कहाणी

Prachi Tadakhe

कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय "दीपस्तंभ २०२५" पुरस्कार या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. कोकण विभागातून, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा बहुमान मिळवणारी ही एकमेव पतसंस्था ठरली आहे.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर येथील Aryan Riverwood Resort येथे हा भव्य सोहळा पार पडला. भारतीय रिझर्व्ह बँक चे संचालक श्री. सतिश मराठे, श्री. उदय जोशी, तसेच फेडरेशनचे अध्यक्ष मा. ओमप्रकाश दादाप्या (काका कोयटे) आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य, पारदर्शक व्यवहार पद्धती आणि सदस्य-केंद्रित सेवा यांसाठी कॅथॉलिक पतसंस्थेचा गौरव करण्यात आला. व्यवसायातील सातत्य, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे संस्थेने कोकण विभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. आनमारी डिसोजा, संचालिका श्रीम. मार्सेलिन डिसोजा, संचालक श्री. जॉन फेराव तसेच सरव्यवस्थापक श्री. जेम्स बॉर्जिस उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अध्यक्षा श्रीम. आनमारी जॉन डिसोजा यांनी सांगितले की, “संस्थेने आजपर्यंत व्यवसायातील कटिबद्धता आणि सहकारातील मूल्यांची अखंडता जपली आहे. पारदर्शक कारभार आणि सभासदांशी विश्वासाचे नाते हेच आमच्या यशाचे खरे सूत्र आहे. या यशामध्ये सभासद, ग्राहक, संचालक मंडळ तसेच अधिकारी-कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.”

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण कोकणासाठी हा अभिमानाचा क्षण असून, कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडीची ही यशस्वी वाटचाल भविष्यातही सहकार क्षेत्रात प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT