नागपूर येथील आरंभ महिला नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.) नागपूर जिल्हा या संस्थेची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे मुख्य कार्यालय संजय गांधी नगर पिपळा रोड हुडकेश्वर, नागपूर येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज कावरे यांनी केले. सभेत संस्थेच्या अध्यक्षा अभिलाषा नानाभाऊ महल्ले यांनी पतसंस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.
"२०२४-२५ वर्षात संस्थेत एकूण ठेवी १६० लक्ष रूपयांच्या आहेत. कर्जवाटप ११२ लक्ष रूपयांचे करण्यात आले आहे. तसेच यावर्षी संस्थेला ६५ हजार ५४७ रूपयांचा नफा झाला असल्याचे सांगून या वर्षीपासून प्रथमतः सभासदांना ०२ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर केले. तसेच संस्था जलद कर्ज वाटप करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणत आहे, अशी माहिती अध्यक्षा महल्ले यांनी दिली.
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात अर्थात संस्थेच्या कार्यक्षेत्रात विविध तालुक्यात संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे. आरंभ पतसंस्थेने महिलांसाठी विविध योजना सुरू करून त्यांना बचतीची सवय लावली आहे. या विविध योजनात १ हजार खातेदार करायचे आणि संस्थेच्या मुदत ठेवी ५ कोटी रुपयांच्या करायचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, असे महल्ले म्हणाल्या.
यावेळी संस्थेचे तज्ञ संचालक तथा सहकार भारती पगारदार पत संस्था प्रकोष्ठ राज्यप्रमुख मा. नानाभाऊ महल्ले यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना, संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कर्जवसुलीची काटेकोर अंमलबजावणी तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने कार्य करावे, असे सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेच्या माजी संचालिका वैशाली कडू या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष मंजुषा भुरे, संचालिका अश्विनी कावरे, नलिनी महल्ले, नीलिमा मुरमारे, भारती नेवले, गायत्री खंडते, वैशाली भोतमांगे, तज्ञ संचालक इंजी. संजय खोंडे,सहायक व्यवस्थापक भूषण चौधरी, लिपिक अश्विनी डूभरे, शिपाई कल्पना नेरकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.