यड्राव बँकेने रचला यशाचा नवा मानदंड! 
Co-op Banks

यड्राव को-ऑप. बँकेला राष्ट्रीय 'डिजिटल बँक' पुरस्कार!

आर्थिक स्थैर्य आणि 'बेस्ट डिजिटल व बेस्ट अर्बन बँके' चा बहुमान मिळवत यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने रचला यशाचा नवा मानदंड.

Prachi Tadakhe

जयसिंगपूर : सहकार क्षेत्रात आर्थिक स्थैर्य, उत्कृष्ट ग्राहककेंद्रीय सेवा आणि डिजिटल बँकिंग क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'यड्राव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यड्राव' या बँकेला राष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचे दोन मोठे बहुमान मिळाले आहेत. बँकेला यंदाचा 'बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक' (सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक) आणि 'बेस्ट डिजिटल बँक ऑफ द इयर' (वर्षातील सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक) या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लखनौ येथे राष्ट्रीय सहकारी बँक आणि पतसंस्था महासंघ (NAFCUB - नॅफकब) आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारत को-ऑप बँकिंग समिट, प्रशिक्षण व पुरस्कार परिषद २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील सहकारी बँकेच्या कामगिरीचे मूल्यांकन करून यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेला 'भारत रत्न सहकारिता सन्मान २०२६' अंतर्गत या गौरवपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या गौरवपूर्ण यशाबद्दल बोलताना बँकेचे अध्यक्ष म्हणाले,

"हे राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आमच्या सर्व सन्माननीय सभासद, लाखो ग्राहक, समर्पित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाची मोठी पावती आहे. ग्राहकांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास, सुरक्षित व्यवहार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही केलेला प्रभावी वापर हीच आमच्या शाश्वत प्रगतीची खरी ताकद आहे. भविष्यातही आम्ही अधिक सक्षम आणि डिजिटल सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू."

यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा वेगवान स्वीकार करत आपल्या ग्राहकांना कॉर्पोरेट बँकांच्या तोडीस तोड डिजिटल सेवा पुरवल्या आहेत. सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, गतिमान सेवा आणि सर्वसामान्यांपर्यंत आधुनिक बँकिंग पोहोचवण्याचे बँकेचे उद्दिष्ट या पुरस्कारांमुळे राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. हा पुरस्कार म्हणजे यड्राव बँकेने सहकार क्षेत्रात निर्माण केलेल्या विश्वासार्हतेचे आणि गुणवत्तेचे प्रतीक मानले जात आहे.

SCROLL FOR NEXT