जयसिंगपूर: आर्थिक सक्षमता, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन, दर्जेदार ग्राहक सेवा आणि सातत्यपूर्ण नफा व व्यवसायवाढ या विविध निकषांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव या बँकेला आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परितोषिक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे आणि संचालक मंडळाच्या हस्ते यड्राव बँकेच्या प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला.
बँकेच्या वतीने चेअरमन अजय पाटील यड्रावकर, उपाध्यक्ष दिलीप मगदुम, संचालक विशाल आवटी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे आणि विकास अधिकारी प्रवीण म्हैसाळकर यांनी हा सन्मान स्वीकारला. या प्रसंगी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट बँक निवडीच्या विविध आर्थिक व तांत्रिक निकषांचे विश्लेषण केले.
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. बँकेने सुरुवातीपासूनच ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बदलत्या बँकिंग प्रवाहाचा स्वीकार करत ग्राहकांच्या सोयीसाठी आधुनिक डिजिटल बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बँकेचे कार्यक्षेत्र सध्या चार जिल्ह्यांत विस्तारले असून, ग्राहकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण ठेवी व कर्ज योजना राबवल्या जात आहेत. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या सबसिडी आणि व्याजपरतावा योजनांचा लाभ तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात बँकेने पुढाकार घेतला आहे.
बँकेची मजबूत आर्थिक सक्षमता आणि रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सर्व निकषांचे काटेकोर पालन यामुळे सामान्य ग्राहकांचा बँकेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. बँकेचा सातत्याने वाढणारा व्यवसाय आणि विस्तार लक्षात घेता, यड्राव बँक लवकरच ५०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार करून कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यड्राव बँकेला जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील बँकिंग व सहकारी क्षेत्रातून बँकेचे अभिनंदन केले जात आहे.