पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता तिच्या मृत्युनंतर कोणाकडे जाते, याबाबत अनेक कुटुंबांमध्ये संभ्रम आढळतो. पतीला संपूर्ण मिळकत मिळते की मुलांना आणि माहेरच्या नातलगांनाही हक्क असतो, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. हिंदू वारसा कायदा मात्र या संदर्भात सरळ व स्पष्ट तरतुदी देतो.
हिंदू वारसा कायद्याच्या कलम १४ नुसार, स्त्रीला वारसा, पोटगी, भेट, बक्षीस, खरेदी किंवा स्त्रीधन अशा कोणत्याही माध्यमातून मिळालेली मालमत्ता तिची स्वतंत्र आणि संपूर्ण मालकी मानली जाते. फक्त ‘लाइफ-इंटरेस्ट’ म्हणजेच आयुष्यभर राहण्यासाठी दिलेला हक्क असल्यास पूर्ण मालकी लागू होत नाही.
पत्नीने मृत्यूपत्र न करता मृत्यू झाल्यास, तिच्या मालमत्तेचे वाटप कलम १५(१) नुसार केले जाते. या कलमानुसार, सर्वप्रथम पती, मुलगा, मुलगी तसेच मुलगा किंवा मुलगी मृत असेल तर त्यांची मुले – नातवंडे – यांचा समान हक्क मानला जातो. आईच्या आधी मरण पावलेल्या मुलाचा कायदेशीर हक्क जरी संपला असला, तरी त्यांची मुले त्यांचा प्रतिनिधी हक्क म्हणून मालमत्ता मिळवू शकतात.
ही सर्व मंडळी हयात नसल्यास मालमत्ता पतीच्या वारसांकडे जाते. त्यांनाही कोणी नसेल तर स्त्रीच्या आईवडिलांना, त्यानंतर वडिलांच्या वारसांना आणि शेवटी आईच्या वारसांकडे मालकीचा हक्क हस्तांतरित होतो.
या सर्वांमध्ये कलम १५(२) मधील अपवाद विशेष लक्षवेधी आहे. स्त्रीला जर मालमत्ता तिच्या माहेरकडून—आई-वडिलांकडून—मिळाली असेल आणि तिच्या पाठीमागे मुलगा, मुलगी किंवा नातवंडे कोणीही जिवंत नसेल, तर ही मालमत्ता पतीकडे किंवा सासरकडे न जाता थेट स्त्रीच्या वडिलांच्या वारसांकडेच जाते. उलट, मालमत्ता नवरा किंवा सासरकडून मिळालेली असल्यास आणि स्त्री निपुत्रिक असताना मृत्यू झाल्यास, ती मालमत्ता फक्त नवऱ्याच्या वारसांकडेच परत जाते. ‘मालमत्तेचा उगम जिथून झाला, तिथेच ती परत जाणे’ हा अपवाद फक्त महिलांसाठी लागू असून, पुरुषांसाठी अशी तरतूद नाही.
कायद्यातील हे नियम स्पष्ट असले तरी, तज्ज्ञांच्या मते मालमत्तेविषयीचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे मृत्यूपत्र तयार करणे. मृत्यूपत्र असल्यास वारसा कायदा लागू राहत नाही आणि व्यक्तीला आपली मालमत्ता कुणाला द्यायची हे स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे कुटुंबातील वाद, गैरसमज आणि न्यायालयीन प्रक्रियांची शक्यता कमी होते.