Whatsapp हॅक! ओटीपी न देता खात्यातून लाखोंची फसवणूक 
Co-op Banks

Whatsapp हॅक! ओटीपी न देता खात्यातून लाखोंची फसवणूक

अनओळखी कॉल आणि फोटो पाठवून Whatsapp हॅक; ओटीपी शेअर न करता देखील व्यावसायिकाच्या बँक खात्यातून ₹4.31 लाखांची ऑनलाईन फसवणूक

Prachi Tadakhe

व्हॉट्सॲप हॅक करून बँक खात्याची माहिती मिळवत एका व्यावसायिकाची तब्बल ४ लाख ३१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराने ओटीपी किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती कोणालाही दिली नसतानाही ही फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी तक्रारीच्या आधारे भोईवाडा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरोधात फसवणूक व माहिती-तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

कंत्राट कामासाठी जात असताना संशयास्पद कॉल

तक्रारदार ३८ वर्षांचे असून ते चुन्नाभट्टी परिसरात राहतात. रंगकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. १४ नोव्हेंबर रोजी ते प्रभादेवी येथील एका फ्लॅटचे रंगकामाचे कंत्राट घेण्यासाठी जात होते.

सायन ब्रिज परिसरात असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणाऱ्याने तक्रारदाराच्या मुलीचे फोटो पाठवून “जमल्यास पैसे पाठवा” असे सांगत कॉल बंद केला. मात्र, संबंधित व्यक्तीने स्वतःची कोणतीही ओळख सांगितली नाही.

वारंवार कॉलनंतर OTP संदेश, तरीही पैसे गायब

त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने पाच ते सहा वेळा फोन कॉल केले, मात्र तक्रारदाराने ते कॉल उचलले नाहीत. काही वेळाने तक्रारदाराच्या मोबाईलवर बँकेकडून ओटीपी संदेश येऊ लागले.

संशय आल्यानेही तक्रारदाराने कोणताही ओटीपी कोणालाही शेअर केला नाही. तरीसुद्धा त्यांच्या बँक खात्यातून तीन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ४ लाख ३१ हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले.

WhatsApp हॅकिंगद्वारे फसवणुकीचा संशय

सायबर गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासानुसार, व्हॉट्सॲप हॅकिंगद्वारे बँक व्यवहारांपर्यंत पोहोचण्यात आल्याचा संशय आहे. ओटीपी न शेअर करता फसवणूक झाल्याने हे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.

भोईवाडा पोलीस सायबर तज्ज्ञांच्या मदतीने कॉल डिटेल्स, बँक व्यवहार, आयपी अ‍ॅड्रेस आणि तांत्रिक माहितीचा तपास करत आहेत.

पोलिसांचा नागरिकांना इशारा

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना अनओळखी कॉल, मेसेज, लिंक आणि फोटोबाबत सतर्क राहण्याचे, तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ बँक व पोलीस यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

SCROLL FOR NEXT