पाचवड येथील व्यापारी साहेबराव शेलार यांचा गौरव करताना वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव, शेजारी सुधाकर गायकवाड, प्रभाकर भोसले, बाळासाहेब वाघ, अविनाश जोशी, सुमेध भट, मकरंद मुळये, प्रीतम भुतकर आदी. 
Co-op Banks

वाई अर्बन बँकेचा पाचवडमध्ये भव्य ग्राहक मेळावा संपन्न!

१०५ वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास! पुढील पाच वर्षांत दोन हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट - अध्यक्ष अनिल देव

Prachi Tadakhe

वाई : वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १०५ वर्षांच्या उज्ज्वल सहकार परंपरेचा गौरव करताना ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे, ठेवीदारांचा विश्वास जपणे आणि कर्जवाटपाबरोबरच नियमित कर्ज वसुलीला प्राधान्य देणे हीच बँकेची भूमिका आहे. कर्जदारांनीही आपला दरमहाचा कर्ज परतफेडीचा हप्ता वेळेत भरून बँकेस सहकार्य करावे आणि आपला सिबील (CIBIL) अहवाल उत्तम ठेवावा, असे आवाहन वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले.

पाचवड (ता. वाई) येथे आयोजित बँकेच्या ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गायकवाड, भुईंज येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले, आसले येथील व्यावसायिक बाळासाहेब वाघ, उद्योजक सुमेध भट, व्यापारी साहेबराव शेलार, उद्योजक अंकुश शिंदे, डॉ. संजीव गोखले, हेमंत पवार, सचिन सूर्यवंशी, मोहन भोसले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष अनिल देव पुढे म्हणाले, "बँकेच्या २७ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अद्ययावत व दर्जेदार सेवा दिली जात आहे. पाचवड शाखेची कामगिरी अत्यंत समाधानकारक असून शाखेतील थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे. ही शाखा दरवर्षी नफ्यात चालत आहे. पूर्वी स्थानिक नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना बँकिंग व्यवहारांसाठी वाई येथे जावे लागत होते. मात्र, आता पाचवड येथेच बँक सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक व्यापारी, शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार सुलभ झाले असून वेळेची मोठी बचत होत आहे."

बँकेच्या पुढील पाच वर्षांत दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उभारण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता आणि आर्थिक शिस्त

बँक व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी आणि संचालक प्रीतम भुतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्यवसायिक बाळासाहेब वाघ यांनी आपल्या सूचना मांडताना सांगितले की, "बँकेचा व्यवसाय वाढवताना केवळ कर्जवाटपावर भर न देता कर्जदारांची आर्थिक क्षमता आणि नियमित वसुलीचा विचार करणे आवश्यक आहे. ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता जपत आर्थिक शिस्त कायम ठेवली पाहिजे. पाचवड ही व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ असल्याने या परिसरातील उद्योजक व शेतकऱ्यांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात."

ग्राहकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा देणे हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे सरव्यवस्थापक संतोष बागुल यांनी प्रास्ताविकात सांगितले.

विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला:

  • मधुकर भोसले (माजी सदस्य, वाई पंचायत समिती)

  • विभास साळुंखे (पत्रकार तथा दैनंदिन ठेव प्रतिनिधी)

  • अविनाश निकम (होंडा दुचाकी डीलर)

  • नंदकुमार तांबोळी (नियमित कर्जदार)

प्रारंभी बँकेचे संचालक काशीनाथ शेलार, मकरंद मुळये, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. ज्योती गांधी व सहायक सरव्यवस्थापक विजय बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

शाखाधिकारी श्रीराम पंडीत यांनी पाचवड शाखेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मल्हारी पेटकर यांनी केले, तर उपसरव्यवस्थापक सुहास पानसे यांनी आभार मानले. या मेळाव्यास पाचवड व परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि बँकेचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT