मंदी 
Co-op Banks

कार्डबोर्ड बॉक्स मंदी दर्शवते अमेरिकेने गमावलेली अर्थव्यवस्थेची गती

लोकांच्या ऐच्छिक खर्चात झालेय मोठी घट

Pratap Patil

नवी दिल्ली /वॉशिंग्टन साधा वाटणारा कार्डबोर्ड बॉक्स हा आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या निदर्शक घटकांपैकी एक मानला जातो. कारण स्मार्टफोनपासून फर्निचरपर्यंत, पिझ्झापासून पाळीव प्राण्यांच्या खाद्यापर्यंत जवळपास प्रत्येक वस्तू वाहून नेण्यासाठी कार्डबोर्ड बॉक्सचाच वापर होतो.

म्हणूनच वस्तूंची मागणी कमी झाली, की या बॉक्सना असणारी मागणीही आपोआप कमी होते. यामुळेच कार्डबोर्ड बॉक्स हा अर्थव्यवस्थेच्या "मंदी" अथवा "तेजी"चा रिअल-टाइम निदर्शक मानला जातो.

जीडीपीपेक्षा जलद निदर्शक:

जीडीपीचा अहवाल तिमाहीतून एकदा येतो. मात्र वस्तूंची मागणी घटली की, बॉक्स उत्पादनात झालेली घट लगेच दिसते. त्यामुळेच हा निदर्शक अर्थव्यवस्थेची त्या त्या वेळेची खरीखुरी स्थिती स्प्ष्ट करतो.

अमेरिकेत मंदीच्या काळात आणि कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीला या बॉक्सना असलेली मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. नंतर स्टिम्युलस चेक्स (प्रोत्साहन धनादेश) मिळाल्यानंतर लोकांनी घरगुती साहित्य, किचन उपकरणं आणि इतर वस्तू खरेदी करून मागणी पुन्हा वाढवली होती.

सध्याची परिस्थिती: कार्डबोर्ड बॉक्स मंदी:

अमेरिकेत खर्चाचा मुख्य भर आता "एआय"वरील गुंतवणूक, सरकारी खर्च आणि आरोग्यसेवा, गृहनिर्माण, विमा यांसारख्या बंधनकारक गरजांकडे वळलेला आहे. परिणामी सध्या ऐच्छिक खर्चात मोठी घट झालेली असून लोक आता कमी वस्तू खरेदी करत आहेत. त्यामुळे अलीकडे कार्डबोर्ड बॉक्सची विक्री पुन्हा मंदावलेली आहे.

यालाच उद्योगतज्ज्ञांनी “कार्डबोर्ड बॉक्स मंदी” असे नाव दिलेले आहे.

ट्रम्प युगातील अनिश्चितता:

२०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेत परतल्यावर अनेकांना वाटले होते की, अमेरिकन उत्पादनांना गती मिळेल. पण शुल्क धोरणे (tariffs) आणि व्यापार भागीदारांवरील दबाव यामुळे परिस्थिती जास्तच गुंतागुंतीची झालेली आहे.

ट्रम्प यांचा आग्रह आहे की, भागीदार देशांनी अमेरिकन उत्पादने अधिक खरेदी करावीत. मात्र अर्थतज्ज्ञ म्हणतात की, हा तुटीचा मुद्दा सुपरमार्केटशी असलेल्या व्यापारासारखा आहे – आपण खरेदी करतो, पण सुपरमार्केट आपल्याकडून काही विकत घेत नाही.

उत्पादक व ग्राहकांवर दबाव:

शुल्क, मोठ्या प्रमाणावरील निर्वासनं (परदेशी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवणे) आणि व्यापार धोरणातील अनिश्चितता यामुळे अमेरिकन उत्पादक साशंक आहेत – किती उत्पादन करावे आणि त्याचा खर्च किती येईल याबाबत ते द्विधा मनःस्थितीत आहेत.

ग्राहकांनाही आर्थिक दबाव जाणवत आहे. परिणामी:

  • अन्नधान्याची मागणी कमी झाली आहे → म्हणजेच उत्पन्न व लोकसंख्या वाढ मंदावलेली आहे.

  • फर्निचर विक्री घटली आहे → म्हणजेच गृहनिर्माण क्षेत्र कमजोर झाले आहे.

"एआय"मुळे मंदी टळली:

अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा चालक मानला जाणारा ग्राहक खर्च कमी झालेला असतानाही , "एआय डेटा सेंटर्समधील गुंतवणूक" मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तिने अमेरिकेला मंदीपासून वाचवले आहे.

यंदा GDP वाढीत एआयवरील गुंतवणुकीचा वाटा ग्राहक खर्चापेक्षा जास्त ठरलेला आहे.

एकूण चित्र:

  • लोक कमी वस्तू खरेदी करत आहेत.

  • उत्पादक अनिश्चिततेत आहेत.

  • व्यापार धोरणांमुळे उत्पादन महाग आणि अवघड होत आहे.

सध्याच्या घडीला अमेरिकेला चालना देतंय ते एआयमधील गुंतवणुकीचं प्रचंड वेगवान वारेमाप प्रमाण. पण, वास्तविक ग्राहक मागणी आणि उत्पादन क्षेत्र थंडावल्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेची नाडी मंदावलेलीच दिसते.

SCROLL FOR NEXT