ठाणे: डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी टीजेएसबी सहकारी बँक लि. (TJSB Bank) तर्फे १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत व्यापक 'सायबर सुरक्षा जनजागृती अभियान' यशस्वीपणे राबविण्यात आले. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ७ राज्यांमधील बँकेच्या सर्व १७२ शाखांमध्ये हे अभियान राबवण्यात आले होते.
गेल्या ५५ वर्षांची यशस्वी बँकिंग परंपरा असलेल्या टीजेएसबी बँकेने नेहमीच ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ग्राहक डिजिटल माध्यमांचा वापर करताना अधिक सतर्क आणि सजग राहावेत, या मुख्य उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महिन्याभर चाललेल्या अभियानात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग या दोन घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
ग्राहकांशी थेट संवाद: प्रत्येक शाखेत येणाऱ्या ग्राहकांशी थेट संवाद साधून फिशिंग ई-मेल, बनावट वेबसाइट्स, OTP व UPI फसवणूक, QR कोड स्कॅम, सोशल इंजिनिअरिंग, आणि बनावट KYC अपडेट संदेश यांसारख्या विविध सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
सुरक्षिततेचे सुत्र: कोणत्याही परिस्थितीत आपला OTP, PIN, CVV किंवा इंटरनेट बँकिंगची गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित बँक किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले.
शाळा, महाविद्यालये व संस्थांना भेटी: बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये आणि विविध स्थानिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगारीचे गंभीर परिणाम आणि त्यापासून बचावाचे उपाय समजावून सांगितले.
सायबर पोलिसांचे मार्गदर्शन: या अभियाना दरम्यान सायबर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनोळखी कॉल, लिंकांपासून घ्यावयाची काळजी आणि ऑनलाइन व्यवहारादरम्यान पाळावयाचे नियम यावर अधिकाऱ्यांनी विशेष प्रकाश टाकला.
"सावध रहा, सुरक्षित रहा आणि सायबर फसवणुकीला बळी पडू नका" - या मुख्य संदेशासह पार पडलेल्या या कार्यक्रमांचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले आणि टीजेएसबी बँकेचे आभार मानले.
आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षित डिजिटल बँकिंग सेवा पुरविण्यासोबतच ग्राहकांना सुरक्षित व्यवहारांसाठी सजग करणे ही बँकेची सामाजिक जबाबदारी आहे, असे मत टीजेएसबी बँकेच्या व्यवस्थापनातर्फे व्यक्त करण्यात आले. या अभियानाला साताही राज्यांतील ग्राहकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
टीजेएसबी सहकारी बँकेबद्दल:
सन १९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक लि. ही देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्यीय नागरी सहकारी बँक आहे. सध्या सात राज्यांमध्ये १७० हून अधिक शाखांच्या जाळ्याद्वारे बँक उत्कृष्ट वित्तीय सेवा देत आहे. ग्राहकांचा दृढ विश्वास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार सेवा यांच्या जोरावर बँकेने ₹२५,००० कोटींपेक्षा जास्त व्यवसायाचा टप्पा पार केला असून सहकार क्षेत्रात आपली एक वेगळी आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.